कोल्हापूर : हुपरीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून | पुढारी

कोल्हापूर : हुपरीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून

हुपरी : कौटुंबिक वादातून पत्नी समीना इम्तियाज नदाफ (वय 28, मूळ रा. रेंदाळ, सध्या हुपरी) हिचा भररस्त्यावर पाठलाग करून व सत्तूरने सपासप 13 हून अधिक वार करून पती इम्तियाज राजू नदाफ (31, मूळ रा. कोरोची) याने खून केला. एमएसईबी कार्यालयाजवळ मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हुपरी (ता. हातकणंगले) येथे ही घटना घडली. हल्लेखोर पतीला येथील काही धाडसी युवक व पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या घटनेने सर्वत्र घबराट पसरली. या हल्ल्यात मृत समीना यांचे वडील सलीम नदाफ हेही जखमी झाले आहेत.

समीना व इम्तियाज यांना दोन मुले आहेत. ते हुपरी येथे राहतात. इम्तियाजचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे, तर समीना एमएसईबी कार्यालयाजवळ चिकन 65 चा गाडा चालवते. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होता. त्यामुळे इम्तियाज हा कोरोची या आपल्या गावी गेला होता.

थरारक पाठलाग करून सत्तूरने वार

मंगळवारी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास इम्तियाज पत्नीच्या चिकन 65 गाड्याजवळ जाऊन तिच्याशी वाद घालू लागला. क्षणार्धात त्याने आपल्याजवळील सत्तूर काढला आणि समीनाच्या डोक्यावर वार केला. जखमी अवस्थेत समीना एका ईस्त्रीच्या दुकानात आपला जीव वाचवण्यासाठी गेली. हातात सत्तूर घेऊन इम्तियाज तिचा पाठलाग करीत तेथे आला व त्याने समीनावर सपासप 13 हून अधिक वार केले. हल्ला एवढा भीषण होता की, मृत समीनाचा गळा धडावेगळा होण्याच्या मार्गावर होता. तरीही तो तिच्यावर वार करतच होता.
गजबजलेल्या रस्त्यावर इम्तियाज हा पत्नीचा खून करून सत्तूर आपल्या मोटारसायकलला अडकवून तेथून निघून गेला.

धाडसी युवकांनी पकडले

माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी हे घटनास्थळी पोहोचले. तोवर इम्तियाजला तेथील युवकांनी धाडसाने अडवून चोप दिला व त्याला पकडले.

या घटनेत समीना यांचे वडील सलीम नदाफ (55) यांच्यावरही वार झाल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.

दरम्यान, सकाळपासून पत्नी, सासरा यांना फोन करीत होतो. मला मुलांशी बोलायचे होते; मात्र फोन न उचलल्याने आपण चिडलो असल्याचे इम्तियाज याने पोलिसांनी सांगितले.

Back to top button