कोकण-प. महाराष्ट्राची बिकट वाट ‘कुंभार्ली घाट’ | पुढारी

कोकण-प. महाराष्ट्राची बिकट वाट ‘कुंभार्ली घाट’

चिपळूण ; समीर जाधव : कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा एक ब्रिटिशकालीन ऐतिहासिक घाट म्हणून कुंभार्ली घाटाचा उल्लेख होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती भागातील हा घाट सह्याद्रीचे कडे पार करून पश्‍चिम महाराष्ट्रात पोहोचतो. गुहागर-विजापूर रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला. मात्र, जिल्ह्यातील कुंभार्ली घाटाची देखभाल अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. या घाटाच्या पुनर्निर्माणाची निविदा राष्ट्रीय महामार्ग विभागाने न काढल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडीमुळे आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे हा मार्ग ठप्प होतो.

यावर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्व घाटरस्ते ठप्प झाले असताना एकट्या कुंभार्ली घाटावर जिल्हा वाहतुकीची जबाबदारी होती. त्यामुळे दळणवळणाच्या द‍ृष्टीने कुंभार्ली घाट अत्यंत महत्त्वाचा आहे.

ऐतिहासिक काळापासून कुंभार्ली घाटाला महत्त्व आहे. सोनपात्रा नावाच्या धनगर समाजातील व्यक्‍तीने या घाटाचा रस्ता सुरुवातीला इंग्रजांना दाखविला. इंग्रजांनी या घाटरस्त्याचा मार्ग अन्य कोणाला माहीत होऊ नये म्हणून घाटाचे सर्वेक्षण केल्यानंतर सोनपात्राला घाटामध्येच मारल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे कुंभार्ली घाटात सोनपात्राचे मंदिरदेखील बांधण्यात आले आहे. ब्रिटिशकाळात बैलगाड्यांसाठी हा प्रमुख मार्ग होता.

एक तिवरेमार्गे व दुसरा कुंभार्लीमार्गे घाट येत होता. उतारपेठ असलेल्या चिपळूणमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील अन्‍नधान्य गोवळकोट बंदराद्वारे मुंबईला पाठवले जायचे. तसेच मुंबईहून येणार्‍या जहाजातून मीठ, कपडे व अन्य चीजवस्तू बैलगाड्यांमधून कुंभार्ली घाटातून पश्‍चिम महाराष्ट्रात पाठविल्या जायच्या. ज्यावेळी पुणे-बंगळर मार्ग झालाच नव्हता अशावेळी कुंभार्ली घाट व चिपळुणातील गोवळकोट बंदर कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होते.

आज मात्र हा घाट दुर्लक्षित झाला आहे. अलीकडे या घाटरस्त्यावरून प्रवासी व अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. समुद्रसपाटीपासून 252 मीटर उंचीवर हा घाट असला, तरी चोवीस तास या रस्त्यावर वाहतूक सुरू असते. एका बाजूला सह्याद्रीचे उंच कडे व दुसर्‍या बाजूला खोल दरी अशा नागमोडी वळणांतून हा घाट पार करीत असताना नवख्या माणसांना धडकी भरते. अलीकडच्या काळातही घाटाची रुंदी वाढल्याने वाहतूक सुरळीत झाली असली, तरी नवखे चालक व प्रवाशांचे हा उंच घाट पाहून अनेकदा छातीचे ठोके वाढतात.

पोफळीपासून कुंभार्ली घाटमाथ्यापर्यंत 20.340 कि.मी.चा रस्ता चिपळूण सामाजिक बांधकाम विभागाकडे देखभालीसाठी आहे. वास्तविक, गुहागर-विजापूर मार्ग क्रमांक 166 ई हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. मात्र, कुंभार्ली घाटरस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाची घोषणा झाल्यानंतर या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण, कोयना व रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी ते गुहागरदरम्यानचा रस्ता काँक्रीटीकरणाचा निर्णय झाला. त्यासाठी निविदाही निघाल्या.

दोन्ही बाजूंनी रस्त्याचे काम सुरूदेखील झाले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने अद्याप कुंभार्ली घाटाच्या कामाची निविदाच काढलेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्‍न भिजत पडला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीने घाटरस्त्याचे मोठे नुकसान झाले, तर सातारा जिल्ह्यातील घाटमाथा ते पाटणदरम्यानचा रस्ता वाहतुकीस योग्य नाही. तरीही पर्याय नसल्याने लोक या मार्गावरून प्रवास करीत आहेत. जिल्ह्यातील आंबा घाट अनेक दिवस बंद असताना कुंभार्ली घाटावर अधिक ताण आला. त्यामुळे सर्वच वाहतूक याच घाटमार्गे सुरू होती.

अनेकवेळा छोटे-मोठे अपघात होऊन तासन्तास वाहतूक कोंडी होत आहे. म्हणूनच या घाटरस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. लोकांच्या आग्रहाच्या मागणीनुसार अलीकडेच घाटात पडलेले खड्डे बांधकाम खात्यामार्फत बुजविण्यात आले. आवश्यक तेथे डांबरीकरण करण्यात आले. म्हणून अलीकडच्या काही दिवसांत वाहतुकीसाठी घाट सुसह्य झाला आहे. परंतु, धोकादायक वळणे, चढ-उतार यामुळे हा घाट धोकादायक बनत चालला आहे.

संरक्षक कठडे कोसळलेलेच…

कुंभार्ली घाट पश्‍चिम महाराष्ट्रातून कोकणकडे उतरताना अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. ब्रेकचा आवाज करीत गाडी उताराने कोकणच्या दिशेने जाते. यावेळी अवघड वळणावर नसलेले संरक्षक कठडे, कोसळलेल्या दरडी आणि खोल दरी पाहून जीव मुठीत घ्यावा लागतो. घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडेच नाहीत.

असलेले कठडे तुटले असून, काही नावाला शिल्लक आहेत. मध्यंतरी येथील प्रांताधिकारी कल्पना भोसले यांनी या घाटादरम्यान रिफ्लेक्टर लावले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, घाटामध्ये संरक्षक भिंतींची गरज आहे. आता घाटात तीन ठिकाणी प्रत्येकी 25 लाख रुपयांच्या संरक्षक भिंती मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामध्ये अधिक भर घालणे गरजेचे आहे.

Back to top button