कोल्हापूरची युद्धकला दिल्‍लीच्या राजपथावर | पुढारी

कोल्हापूरची युद्धकला दिल्‍लीच्या राजपथावर

कोल्हापूर ; सागर यादव : हलगीच्या कडकडाटात डोळ्याची पापणी लवते त्याहीपेक्षा वेगाने शस्त्र घेऊन प्रतिस्पर्ध्यावर वार करणारे हात हा कोल्हापुरी मर्दानी बाणा यंदा दिल्‍लीच्या राजपथावर अवतरणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूरच्या ‘स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा’ या पथकाची प्रात्यक्षिके प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अवघ्या देशाला पाहायला मिळणार आहेत.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने दिल्‍ली येथे घेण्यात आलेल्या ‘वंदे भारतम्’ या स्पर्धेतून कोल्हापूरच्या शिवकालीन युद्धकला पथकाची निवड करण्यात आली. ताराराणी व लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंच्या करवीरनगरीचा रांगडा वारसा सांगणार्‍या युवक-युवती यामध्ये सहभागी होत आहेत.

या पथकात ओंकार पाटील, गणेश कदम, अभिनव मांगुरे, ऋषीकेश मुसळे, आदिती साळोखे, एकता सोळोखे, तेजस्विनी अनगळ, सिद्धेश जाधव, प्रथमेश पाटील, ओम मंडलिक, शिवम मंडलिक यांचा समावेश आहे. त्यांचा संदीप साळोखे, अतुल साळोखे, राजेश मंडलिक, प्राची मंडलिक, स्वरूपा साळोखे आदींनी सराव करून घेतला आहे.

तालीम संस्थांना शतकी परंपरा

भावी पिढी सक्षम-निर्व्यसनी व्हावी, पारंपरिक खेळ, युद्धकलेचे जतन-संवर्धन-संरक्षण व्हावे, या उद्देशाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील पेठांमध्ये तालीम संस्था विकसित केल्या. कुस्तीचे आखाडे बांधण्यासाठी जागा, इमारत उभारणीसाठी निधी आणि संस्थेचे कार्य अखंड सुरू राहण्यासाठी उत्पन्‍नाचे स्रोत निर्माण करून दिले. अशा या तालीम संस्थांमध्ये कुस्ती, शिवकालीन यद्धकलेसह विविध मर्दानी खेळांचे जतन-संवर्धन होऊ लागले. या तालीम संस्थांनी आपली शतकी वाटचाल पार केली असून, आज शिवकालीन युद्धकलांच्या जतनाचे व प्रशिक्षणाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.

युद्धकलेचा वारसा असणारे आखाडे

सह्याद्री प्रतिष्ठान ट्रस्ट संचलित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्र रामानंदनगर, कसबा बावडा, जुना बुधवार व शाहूपुरी कुंभार गल्‍ली, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, खंडोबा-वेताळ तालीम आखाडा, सणगर बोडके तालीम, नंगीवली तालीम आखाडा, कै. आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था, शिवगर्जना, हिंदू योद्धा, शिवसंस्कार प्रतिष्ठान आखाडा, रामकृष्ण मर्दानी आखाडा, हिंद मर्दानी आखाडा, शिवशंभो, स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा, शिवशक्‍ती प्रतिष्ठान, शिवशाहू मर्दानी आखाडा, शांतिदूत मर्दानी आखाडा, गुरुकुल आखाडा, श्रीमंत योगी मर्दानी आखाडा, फिरंगोजी शिंदे आखाडा, भैरवनाथ मर्दानी खेळाचा आखाडा गिरगाव, शिवाजी तालीम चोकाक मर्दानी आखाडा अशा आखाड्यांकडून शिवकालीन युद्धकलेच्या जतन-संवर्धनासह प्रचार-प्रसाराचे काम सुरू आहे.

राष्ट्रीय सण, धार्मिक सण-उत्सव-समारंभ, राष्ट्रपुरुषांच्या जयंती, विविध सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा, लोककला कार्यक्रमांच्या निमित्ताने या आखाड्यांच्या वतीने वर्षभर ठिकठिकाणी शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके सादर केली जातात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांबरोबरच कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हैदराबाद, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्‍ली, उत्तर प्रदेश, हरियाणा या देशाच्या विविध राज्यांत प्रात्यक्षिके सादर केली जातात. भारताच्या शेजारील नेपाळ देशातही कोल्हापूरच्या युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहेत.

अशी होतात शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके

शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांत लाठी-काठी, फरी गदका, तलवार, पट्टा-दांड, भाला, विटा या शस्त्रास्त्रांसह मावळे व रणरागिणी मुले-मुली एकेरी, दुहेरी व सांघिक प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. पगडी, बाराबंदी, तुमाण, नऊवारी साडी अशी वेशभूषा करणार्‍या मुला-मुलींकडून रणहलगी, कैचाळ-घुमक्यांच्या ठेक्यावर ही चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जातात.

Back to top button