कोल्हापूर : ऑक्सिजन घटल्याने पंचगंगेतील मासे मृत | पुढारी

कोल्हापूर : ऑक्सिजन घटल्याने पंचगंगेतील मासे मृत

कोल्हापूर ; आशिष शिंदे : पंचगंगेला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण सुटता सुटेना. दूषित पाणी थेट नदी पात्रात मिसळत असल्याने दिवसेंदिवस हा प्रदूषणाचा विळखा पंचगंगेभोवती अधिकच घट्ट होत आहे. गुरुवारी (दि. 20) नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मृरत माशांचा खच पाहायला मिळाला होता. या माशांचा मृत्यू नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्राथमिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

जलचरांसाठी पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे (डीओ) प्रमाण महत्त्वाचे असते. हे प्रमाण निश्‍चित मानकाच्या खाली गेल्यास जलचरांचा मृत्यू होतो. पंचगंगेतील मृत माशांचा खच पाहून प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या क्षेत्रातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडे पाठवले होते.

यातून जो प्राथमिक अहवाल समोर आला, त्यामध्ये पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी 4.7 इतकी खालावल्याचे एमपीसीबीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दुसर्‍याच दिवशी ऑक्सिजनचे प्रमाण 7 पर्यंत वाढले. या अहवालानुसार माशांचा मृत्यू ऑक्सिजन कमी झाल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक अहवालातील या कारणाचा नेमका शोध घेण्यासाठी पाण्याचा पीएच, बीओडी, सीओडी, नायट्रेट, फेकल कोलिफॉर्म तसेच हेवी मेटल्स तपासण्यात येत आहे.

सांडपाण्यामुळे प्रमाण कमी

पिण्याचे पाणी, शहराचे सांडपाणी, कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी यांतील विषारी सेंद्रिय पदार्थांची तीव्रता जैविक ऑक्सिजन मागणीच्या (बीओडी) प्रमाणाद्वारे मोजली जाते. बीओडीचे प्रमाण जेवढे जास्त, तेवढे त्या सांडपाण्याची तीव्रता जास्त. या पद्धतीत प्रामुख्याने पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे मोजमाप केले जाते.

प्रतिलिटर 6 मिलिग्रॅमपेक्षा ऑक्सिजनचे प्रमाण घटले

पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण 6 मिलिग्रॅम प्रति लिटरपेक्षा कमी आहे. पाण्यातील जैविक पर्यावरण निरोगी राहण्यासाठी विरघळलेले ऑक्सिजन 6 मिलिग्रॅम प्रति लिटर पर्यंत असणे गरजेचे असते. मात्र पंचगंगा नदीतील प्रमाण 4.7 इतके कमी झाले होते, असे एमपीसीबीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

पहिल्या दिवशी (दि. 20) – 4.7 मिलिग्रॅम प्रतिलिटर
दुसर्‍या दिवशी (दि. 21) –
7 मिलिग्रॅम प्रतिलिटर

जलचरांसाठी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण महत्त्वाचे असते. पंचगंगेच्या पाण्यातील हे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. नेमके कशामुळे माशांचा मृत्यू झाला हे शोधण्यासाठी पुन्हा पाण्याचे नमुने घेण्यात आले असून सविस्तर तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
– प्रमोद माने, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

Back to top button