कोल्हापूर : परताव्याच्या बहाण्याने 10 लाखांची फसवणूक | पुढारी

कोल्हापूर : परताव्याच्या बहाण्याने 10 लाखांची फसवणूक

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : घसघशीत परताव्याच्या बहाण्याने ताराबाई पार्क येथील व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा आणि पश्‍चिम बंगालमधील तरुणांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांत एक स्थानिक तरुण आहे. केदार नारायण रानडे (रा. राजारामपुरी), अजय दौडमणी (गोवा), सुकांता रणजित भौमिक (पश्‍चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, ताराबाई पार्क येथील सुहास नागण्णावर यांचा मार्केटिंगचा व्यवसाय आहे. 2017 मध्ये त्यांची संशयित स्थानिक तरुण केदार रानडे याच्याशी ओळख झाली. कंपनीत केलेल्या गुंतवणुकीवर घसघशीत कमाईचे आमिष दाखवून चांगला परतावा देण्याची भुरळ त्याने घातली. त्यानंतर संशयिताने अजय दौडमणी याच्याशी भेट घडवून दिली.

गुंतवणूक केल्यानंतर सुरुवातीला काही काळ परतावा देण्यात आला. त्यानंतर नागण्णावर यांनी दोन टप्प्यात कंपनीत 10 लाखांची रक्‍कम गुंतवली. संशयित भौमिकने नागण्णावर यांना तुमच्या पैशाचे बिटकॉईन घेतले आहेत, असे सांगून लवकरच परतावा देण्यात येईल, असे सांगितले. गुंतवणुकीची रक्‍कम परत मिळविण्यासाठी नागण्णावर यांनी प्रयत्न केले. मात्र, संशयितांनी टाळाटाळ सुरू केली. त्यांनतर काही दिवसांनी कंपनीला 10 कोटींचा तोटा झाला आहे, असे सांगून पैसे परतावा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button