सीपीआर प्रशासनास अग्‍निशमन यंत्रणेचा विसर | पुढारी

सीपीआर प्रशासनास अग्‍निशमन यंत्रणेचा विसर

कोल्हापूर ; सुनील सकटे : सामान्यांसाठी वरदान असणार्‍या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) अग्‍निशमन यंत्रणेचा अभाव आहे. अग्‍निशमन दलाने फायर ऑडिटमध्ये त्रुटी दाखवूनही प्रशासनाने मात्र याकडे अक्षम्य डोळेझाक केली आहे. सीपीआर प्रशासनाला अग्‍निशमन यंत्रणेचा विसर पडल्याचे चित्र आहे. या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये स्फोट होऊनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. विविध शासकीय कार्यालयांतही हेच चित्र असून एखादी दुर्घटना घडल्यास याचा फटका सामान्यांना बसल्याशिवार राहणार नाही.

‘फायर अ‍ॅक्ट 2006’ ची अंमलबजावणी शहरात 2012 पासून सुरू झाली आहे. या कायद्यानुसार सर्व इमारतींचे फायर ऑडिट करून घेणे बंधनकारक आहे. शहरातील कमर्शियल इमारतीसह, शासकीय व खासगी रुग्णालये, शासकीय कार्यालये यांच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार महानगरपालिका अग्‍निशमन दलाने बहुतांशी शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, शासकीय-निमशासकीय इमारती यांचे फायर ऑडिट केले आहे. शहरातील सुमारे 300 रुग्णालये आणि 50 हून अधिक शासकीय कार्यालयांच्या इमारतींचे ऑडिट पूर्ण झालेे आहे.

सीपीआर रुग्णालयात केवळ फायर एक्स्टींग्विशर (अग्‍निशमन नळकांड्या) अडकवलेल्या स्थितीत आढळतात. पाण्याची टाकी, पंप, पाईपलाईन यंत्रणा अशी आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे ऑडिटमध्ये सूचित केले आहे. तरीही याची पूर्तता अद्याप केलेली नाही. शासकीय कार्यालयाच्या इमारतींची तशीच अवस्था आहे. बहुतांश इमारतीमध्ये केवळ फायर एक्स्टींग्विशरच्या नळकांड्या दिसत असून इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध आहे. तेथे मेंटनन्स करण्याची गरज आहे.

देखभाल दुरुस्ती वेळेवर होणे गरजेचे

महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, आयसोलेशन आणि फिरंगाई या तिन्ही रुग्णालयांत अग्‍निशमन यंत्रणा नव्याने कार्यान्वित केली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय इमारत या दोन्ही ठिकाणी समाधानकारक यंत्रणा उपलब्ध आहे. जुन्या इमारतींमध्ये अशा सुविधांचा अभाव दिसून येतो. यंत्रणा उपलब्ध असलेल्या ठिकाणी त्याची देखभाल दुरुस्ती वेळेवर होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या द‍ृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या सीपीआर रुग्णालयात अग्‍निशमन यंत्रणेची दुरवस्था आहे.

Back to top button