कोल्हापूरसह १५ महापालिकांत मार्चमध्ये रणधुमाळीची शक्यता! | पुढारी

कोल्हापूरसह १५ महापालिकांत मार्चमध्ये रणधुमाळीची शक्यता!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेसह राज्यभरातील कोल्हापूरसह 15 महानगरपालिका आणि 23 जिल्हा परिषदांच्या मिनी विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम मार्चमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. प्रभाग पुनर्रचनेचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने निवडणूक आयोगाला सादर केला आहे. मुंबईतील प्रभाग 227 वरून 336 वर जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेच्या आराखड्यावर हरकती सूचना मागवून तो आयोगाकडून प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे फेब्रुवारीत कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू शकते. मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल किंवा ऑक्टोबर 2022 पर्यंत पुढे ढकलली जाईल असे सांगण्यात येत होते. पण, ही निवडणूक महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी घेण्याचा प्रयत्न असल्याचे समजते. महापालिका निवडणूक 25 फेब्रुवारी पूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र, आता ही निवडणूक मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

या महापालिकांत रणधुमाळी

मुंबईसोबत नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, सोलापूर, अकोला, औरंगाबाद या महापालिकांचीही रणधुमाळी मार्चमध्ये होऊ घातली आहे.

Back to top button