कोल्हापूर जिल्हा बँक : सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेसची | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक : सत्ता राष्ट्रवादी-काँग्रेसची

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे तर संख्याबळाच्या निकषानुसार उपाध्यक्षपदी आमदार राजूबाबा आवळे यांना संधी मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे बँकेची सूत्रे आली आहेत. आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा घेण्याचा हे दोन्ही पक्ष पुरेपूर प्रयत्न करतील. त्याचवेळी जिल्हा बँक अध्यक्ष निवडीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल ही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केलेली घोषणा हवेत विरली आहे.

पाडापाडीने कोरे नाराज

विनय कोरे यांना नको असलेले बाबासाहेब पाटील आसुर्लेकर निवडून आले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्‍त केला. आघाडी अंतर्गत पाडापाडीमुळे विनय कोरे यांनी चांगलेच खडसावले. याचा परिणाम अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवर होणार नव्हताच आणि तसा तो झालाही नाही. जिल्ह्याच्या राजकारणात विनय कोरे आणि हसन मुश्रीफ हे कायमपणे एकत्र राहिले आहेत. महापालिकेतील सत्तांतरापासून ते आजच्या जिल्हा बँकेच्या निवडीपर्यंत त्यांच्यात समज-गैरसमज आणि अपसमज हे शब्द आले नाहीत किंवा त्यांनी येऊही दिले नाहीत.

आर्थिक नाड्या राष्ट्रवादी व काँग्रेसकडे

जिल्ह्यात आर्थिक सत्ता स्थानावर वर्चस्व ठेवण्यात आता काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आले आहे. भाजपचे माजी आमदार अमल महाडिक या आघाडीत आहेत. शिवसेनेचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि निवेदिता माने या सत्तारूढ आघाडीत आहेत.

संख्याबळानुसार पदे

जिल्हा बँकेची मोट बांधण्यात मोठी भूमिका बजावणार्‍या मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्षपद जाणार हे स्पष्ट होते. तसे ते गेले आहे. संख्याबळानुसार काँग्रेसकडे उपाध्यक्षपद जाणार हेही निश्‍चित होते. काँग्रेसचे आमदार राजू आवळे हे दुसर्‍यांदा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष झाले. यापूर्वी विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली होती.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जोडण्यांना येणार जोर

येणार्‍या काळात महापालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती आणि साखर कारखाने, बाजार समित्या निवडणुका आहेत. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक नाडी कोणाच्या हातात याला कमालीचे महत्त्व आहे. ही आर्थिक नाडी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हातात आली आहे. त्यामुळे ते आपल्या सत्तेचा फायदा करून घेणार हे नक्‍कीच.

शिवसेना नेत्यांना ऐक्य घडविण्यात अपयश

या सगळ्या राजकीय गदारोळात शिवसेनेने काय कमावले आणि काय गमावले याचा लेखाजोखाही मांडला जात आहे. शिवसेनेतील फूट या निमित्ताने उघड झाली आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि निवेदिता माने हे शिवसेनेचे सदस्य जिल्हा बँकेत सत्तारूढ आघाडीबरोबर आहेत तर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे विरोधात आहेत.

त्यांच्या बरोबर असलेले बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे शिवसेनेत नसले तरी विजयी मेळाव्यात बोलताना त्यांनी बाबासाहेब पाटील सरूडकर यांचा शिवसेनेचे उमेदवार म्हणून पहिला प्रचार मेळावा आपण घेतल्याची आठवण जाणीवपूर्वक करून दिली होती तर प्राचार्य अर्जुन आबिटकर हे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू आहेत.

त्यामुळे हे तिघेजण त्या अर्थाने शिवसेनेशी जोडले गेले आहेत. जिल्हा बँकेत शिवसेना तीन विरुद्ध दोन अशी परिस्थिती आहे.
कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या विजयी मेळाव्यात संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनीही शिवसेनेचे पाचही संचालक एकत्र राहतील आणि महत्त्वाची भूमिका बजावतील असे सांगितले होते. त्याचे काय झाले हे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीने दाखवून दिले आहे.

शेतकर्‍यांना न्यायाची अपेक्षा

काँग्रेस – राष्ट्रवादीला सत्ता मिळाली आहे. पण शेतकर्‍यांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज हवे आहे. तसेच कर्जाची एकरीमर्यादा वाढविण्याचे आश्‍वासनही नेत्यांना पाळावे लागणार आहे. त्याचबरोबर कर्जमाफी योजनेत ज्यांनी नियमितपणे आणि वेळेत कर्जफेड केली त्यांना राज्य सरकारने 50 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. जिल्हा बँक यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे सगळेच महाआघाडीतील घटक पक्ष आहेत. त्यांनी आता याचा पाठपुरावा करावा, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.

Back to top button