कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षपदी मुश्रीफ यांचे नाव निश्चित | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षपदी मुश्रीफ यांचे नाव निश्चित

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक ) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी (दि. 20) होत आहे. संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद सोपविण्यात येणार असून, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे. उपाध्यक्षपदासाठी उत्सुकता कायम आहे.

दरम्यान, सत्तारूढ आघाडीची सकाळी 11 वाजता बैठक होत असून, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे हे आघाडीअंतर्गत पाडापाडीबद्दल आपली स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांसमोर मांडणार आहेत. त्यामुळे आघाडीच्या बैठकीत वातावरण तप्त असेल, अशी खात्रीलायक माहिती आहे. ( कोल्हापूर जिल्हा बँक )

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला 18, तर विरोधी आघाडीला 3 जागा मिळाल्या आहेत. संचालक मंडळात नको असलेले कोरे यांचे विरोधी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर निवडून आल्याने विनय कोरे संतप्त आहेत. त्यामुळे उद्या होणार्‍या सत्ताधारी आघाडीच्या बैठकीत कोरे पॅनेलमध्ये घेऊन आमच्या उमेदवारांना का पाडले? हा विश्वासघात का केला? याचा जाब विचारणार आहेत. ( कोल्हापूर जिल्हा बँक )

दरम्यान, बुधवारी सायंकाळी हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात दाखल झाले. आमदार विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, प्रा. जयंत पाटील यांनी त्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली.

दरम्यान, संख्याबळानुसार अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसला संधी मिळणार की आघाडीअंतर्गत तडजोडीच्या राजकारणातून जनसुराज्य शक्ती पक्षाला उपाध्यक्षपद मिळणार, याचा निर्णय उद्याच्या बैठकीत होणार आहे. मात्र, सध्या तरी संख्याबळानुसार उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार असल्याचे समजते.

माझ्या भेटीचा बँक निवडीशी संबंध नाही ः विनय कोरे

शासकीय विश्रामगृह येथे मुश्रीफ यांची भेट घेऊन बाहेर पडल्यावर विनय कोरे यांनी आपली भेट ही मुख्यमंत्री रस्ते योजनेसंदर्भात होती. जिल्हा बँकेसंदर्भात कोणतीही चर्चा आपण केली नाही. जी काही चर्चा करायची ती खुलेपणाने उद्याच्या बैठकीत करू, असे दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

जिल्हा बँक निकालात कोणत्या तालुक्यात कोणाला किती मते पडली हे स्पष्ट झाले आहे, असे सांगून कोरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Back to top button