कोल्हापूर महापालिका : प्रारूप प्रभाग रचनेवर शिक्‍कामोर्तब | पुढारी

कोल्हापूर महापालिका : प्रारूप प्रभाग रचनेवर शिक्‍कामोर्तब

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर अखेर प्रशासनाने शिक्‍कामोर्तब केले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व योग्य ते बदल करून प्रभाग रचनेचा आराखडा आयोगाला 15 जानेवारीला पाठविण्यात आला. आयोगाकडून तारीख कळविण्यात आल्यानंतर कोल्हापुरात प्रभाग रचनेचे जाहीर प्रसिद्धीकरण होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रक्रियेसह आरक्षण सोडत निघण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल-मेमध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी माजण्याची शक्यता महापालिका अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेची पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होत आहे. लोकसंख्येनुसार 92 नगरसेवकांसाठी 31 प्रभाग झाले आहेत. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 प्रभाग आणि 2 नगरसेवकांचा 1 प्रभाग यांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक प्रभागात अ, ब, क या क्रमाने अंतर्गत रचना असेल. त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पहिलीच निवडणूक आहे, असे गृहीत धरून प्रभाग रचना व आरक्षण निश्‍चित करावे, असे आयोगाने स्पष्ट सूचना दिल्या
आहेत.

महापालिका प्रशासनाने 23 नोव्हेंबर 2021 ला त्रिसदस्य प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून त्यासंदर्भातील अहवाल आयोगाला सादर केला होता. त्यानुसार आयोगाने महापालिका अधिकार्‍यांना नियमानुसार आवश्यक बदल सुचविले होते. हे बदल करून महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाला प्रारूप प्रभाग रचनेचा अहवाल सादर केला.

महापालिका सभागृहाची मुदत 15 डिसेंबर 2020 ला संपली आहे. परंतु कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही. परिणामी राज्य शासनाने महापालिकेवर प्रशासकांची नियुक्‍ती केली. आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार आहे. डिसेंबर 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक प्रभाग रचना पद्धतीनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.

फेब्रुवारी 2021 मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होत असतानाच कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत राज्य शासनाने बहुसदस्य प्रभाग रचना पद्धतीने निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता महापालिकेची निवडणूक त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार होत आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील महिला होणार महापौर…

स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यानुसार महापालिकेतील 92 पैकी 46 नगरसेविका असतील. त्यात सर्वसाधारण प्रवर्गातील 79 पैकी 40 जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जाती प्रवर्गात 12 पैकी 6 जागांवर महिलांचे आरक्षण असेल. अनुसूचित जमातीसाठी एकच जागा असल्याने ती सर्वांसाठी खुली असेल.

नोव्हेंबर 2019 मध्ये मुंबईत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत 2020-2025 या पाच वर्षांसाठी महापौर आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यात कोल्हापूर महापालिकेसाठी ओबीसी महिला असे आरक्षण जाहीर झाले होते.

परंतु आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकती ओबीसी आरक्षण नाही. ते सर्व प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी धरण्यात आले आहेत. परिणामी नव्या सभागृहातील पहिले अडीच वर्ष सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेला महापौर होण्याची संधी मिळणार आहे. महिलांसाठी महापौरपदाचा मान असल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण असलेल्या प्रभागातून निवडून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

Back to top button