कोल्हापूर : लाचप्रकरणी कॉन्स्टेबलला पोलिस कोठडी | पुढारी

कोल्हापूर : लाचप्रकरणी कॉन्स्टेबलला पोलिस कोठडी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : बांधकाम व्यावसायिकांकडून 25 हजार रुपये उकळून, त्यानंतरही 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग मर्दाने (वय 35, रा. शिंगणापूर, करवीर) याला न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, लाचप्रकरणी ‘लक्ष्मीपुरी’ तील वरिष्ठ अधिकार्‍यांचीही चौकशी करण्यात येत आहे, असे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

नागाळा पार्क येथील बांधकाम व्यावसायिक अनिल साखळकर याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या आमिषाने कॉन्स्टेबल मर्दाने याने 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 25 हजार रुपये यापूर्वीच उकळण्यात आले होते. तर उर्वरित रकमेसाठी तगादा सुरू होता. अखेर त्यांच्यात 10 हजार रुपयांवर समेट झाला होता. साखळकर यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

पडताळणीअंती मर्दानेने 25 हजारांची रक्‍कम यापूर्वीच घेऊन पुन्हा 10 हजाराच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्‍न झाल्यानंतर सोमवारी त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. आज, मंगळवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सायंकाळपर्यंत निलंबन?

लाचप्रकरणी अटक केलेल्या कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दाने याच्यावर बुधवारी सायंकाळपर्यंत निलंबनाची कारवाई शक्य असल्याचे पोलिस मुख्यालयातून सांगण्यात आले.

दोषी ठरणार्‍यांवर कारवाई करणार

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक साखळकर याच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल झालेला असताना तपास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे न सोपविता कॉन्स्टेबल मर्दाने याच्याकडे कोणी दिला, दीड महिन्यापूर्वी 25 हजार रुपये उकळण्यात आले. त्यात लाभार्थी कोण आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे. यासंदर्भात वरिष्ठाधिकार्‍यांकडे चौकशी करण्यात येत आहे. दोषी ठरणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही बुधवंत यांनी सांगितले.

Back to top button