कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक शिवसेना लढविणार - पुढारी

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक शिवसेना लढविणार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्‍ला आहे. परिणामी कोल्हापूर उत्तरवर शिवसेनेचाच हक्‍क आहे. विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी, असा निर्णय आमदारांसह सर्व माजी आमदार, जिल्हाप्रमुखांनी घेतला आहे. त्यासंदर्भातील अहवाल शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून याठिकाणी पोटनिवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खा. प्रा. संजय मंडलिक यांच्यासह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, सर्व माजी आमदार व जिल्हाप्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही

काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांचे अकाली निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने तो मिळाल्यास आघाडीला कोणताही धक्‍का लागणार नाही. या मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवावी, ही शिवसैनिकांसह पदाधिकार्‍यांची इच्छा आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांना कळविण्यात येणार आहे. ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही खा. मंडलिक यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले की, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, दिवाकर रावते व शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांना घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहोत. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरणार आहे.

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी, ही पब्लिक डिमांड आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी केलेल्या दगाफटक्याची ही रिअ‍ॅक्शन आहे. यापुढेही भविष्यात शिवसैनिकांकडून हीच रिअ‍ॅक्शन उमटेल. कोल्हापूर उत्तर जिंकूच. त्याचबरोबर महापालिका, जिल्हा परिषदेतही शिवसेनेचा भगवा फडकेल. जिल्ह्यातील आमदारांचीही संख्या वाढेल, असे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.

खा. मंडलिक यांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील हे विस्मरणात जातात. त्यामुळे त्यांची गल्‍लत होते, असा टोला लगावला. 2009 मध्ये शिवसेनेचे 3 व 2014 मध्ये 6 आमदार होते, असे मंडलिक यांनी सांगितले. राजेश क्षीरसागर यांनी सांगितले, की, पाटील यांनी मला निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे सांगितले आहे. परंतु; पदवीधर मतदारसंघातून पाटील यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनीही जीवाचे रान केले. तसेच मला निवडून आणले म्हणून सांगणार्‍या पाटील यांनी 2019 मध्ये भाजपचे उमेदवार महेश जाधव यांचा पराभव का केला? असा प्रश्‍न उपस्थित होतो, असेही क्षीरसागर म्हणाले.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आला पाहिजे. तरीही काँग्रेसला निवडणूक लढवायची असल्यास ते लढवू शकतात. राष्ट्रवादीने उमेदवार उभा करावा. मैत्रीपूर्ण लढत होऊ दे. सर्व पक्षांना आपली ताकद कळेल. शेवटी कोणत्याही पक्षाचा उमेदवार विजयी झाला तरी महाविकास आघाडीचाच आमदार होणार आहे. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ठाकरे यांनी आदेश द्यावा; ही जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, असे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.

यापुढेही पदाधिकार्‍यांची एकजूट

शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये दुफळी असल्याचे कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवले आहे. परंतु; पहिल्यांदाच कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीनिमित्त खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हाप्रमुख एकत्र आले. सर्किट हाऊसमध्ये बैठक झाल्यानंतर सर्वजण पत्रकार परिषदेला सामोरे गेले.

यापुढेही अशीच एकी राहणार का? या प्रश्‍नावर, यापुढेही शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांची एकजूट दिसेल, अशी ग्वाही खा. मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर, आ. आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी दिली.

पोटनिवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवू : राजेश क्षीरसागर

राजेश क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेतृत्व करत आहेत. गेल्या दोन वर्षातील महाविकास आघाडी पक्षातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील सर्व मंत्र्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन उत्तमप्रकारे सरकार चालवत आहेत. परंतु; कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक सातपैकी पाचवेळा शिवसेनेने जिंकली आहे. या पोटनिवडणुकीतही ही ताकद दाखवून देऊ.

Back to top button