मुंबई-कोल्हापूर विमानसेवा पुन्हा सुरू | पुढारी

मुंबई-कोल्हापूर विमानसेवा पुन्हा सुरू

उजळाईवाडी ; पुढारी वृत्तसेवा : गेले सव्वादोन महिने ट्रू-जेटची खंडित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. मुंबईहून आलले विमान कोल्हापूर विमानतळावर सोमवारी दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी दाखल झाले. त्यातून 21 प्रवासी आले, तर कोल्हापूरहून 1 वाजून 15 मिनिटांनी 8 प्रवाशांना घेऊन विमान मुंबईला रवाना झाले .

ट्रू-जेटच्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद होता. मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही सेवा चांगल्या प्रकारे सुरू होती; पण कंपनीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे 3 नोव्हेंबर 2021 पासून गेले सव्वादोन महिने ही विमानसेवा खंडित झाली होती. खंडित झालेली विमानसेवा 17 जानेवारी 2022 पासून नव्या जोमाने सुरू होत आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

फेब्रुवारीपासून ही विमानसेवा आठवड्यातून सातही दिवस सुरू करण्याचा मानस कंपनी प्रशासनाकडून व्यक्‍त केला जात आहे. गेले दोन- सव्वादोन महिने विमानसेवा खंडित असल्याने व कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे सोमवारी प्रवासी मात्र कमी राहिले; पण विमानसेवा सुरळीत सुरू राहिल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

Back to top button