नगरोत्थान अंतर्गत महापालिकेच्या २३७.४७ कोटींच्या निधीस तांत्रिक मंजुरी | पुढारी

नगरोत्थान अंतर्गत महापालिकेच्या २३७.४७ कोटींच्या निधीस तांत्रिक मंजुरी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास यांतर्गत महापालिका हद्दीमधील रस्ते, गटार, भुयारी मार्ग व फुटपाथच्या कामांकरिता राज्य शासनाने 237 कोटी 47 लाखांच्या निधीस तांत्रिक मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 100 कोटींचा निधी उपलब्ध होणार असून, जानेवारीअखेर महापालिकेस तो वर्ग केला जाणार आहे. निधीतून महापालिका क्षेत्रातील प्रमुख 82 रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय विश्रामगृह येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. क्षीरसागर म्हणाले, महापालिकेने नगरोत्थान योजनेंतर्गत 189.55 कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. 2017 पासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. काही सुधारणा करून प्रस्ताव शासनास पुन्हा सादर केला. यास सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट 2021 रोजी मंत्रालयात बैठक घेऊन नव्याने सादर केलेल्या 203 कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य सरकारने आता 237 कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी दिली आहे.

मर्यादित उत्पन्‍न स्रोतामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. अशातच 2019 व 2021 च्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदी व त्यास जोडणार्‍या नाल्यांमुळे शहरास महापुराचा फटका बसला आहे. महापालिकेच्या 82 प्रभागांपैकी 35 प्रभाग महापुराने बाधित झाले होते. त्यामुळे पूरबाधित प्रभागांतील रस्त्यांची चाळण झाली. नागरिकांना यातून ये-जा करणे जिकिरीचे होत आहे. या निधीतून शहरातील प्रमुख वर्दळीचे 82 रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटार, ड्रेनेजलाईन, फुटपाथ यांचा सुनियोजित विकास करण्यात येणार आहे. महापालिकेच्या 30 टक्के हिश्शासाठी ‘मुफ्रा’ कंपनीकडून कर्ज घेण्यात येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

शहरातील निर्माण चौकातील प्रस्तावित महापालिकेच्या नवीन इमारतीचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या केएमटीच्या 134 पैकी 58 बसेस रस्त्यावर धावत आहेत. काही बसेससाठी 10 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. यासंदर्भात मनपा प्रशासक व नगरविकासमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील, असेही क्षीरसागर म्हणाले.

नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्त्यांची होणारी विकासकामे

नगरोत्थान योजनेतून शहरातील प्रमुख 20 कि.मी.चे रस्ते, 15 किलोमीटर लांबीचे उपरस्ते व त्यांना जोडणारे 30 कि.मी. लांबीचे रस्ते, स्ट्रॉम वॉटरसह भुयारी गटार, फुटपाथ व इतर कामांचा समावेश आहे. यात गंगाई लॉन ते नृसिंह देवालय फुलेवाडी रिंगरोड, खरी कॉर्नर ते गांधी मैदान ते निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक, मंगेशकरनगर उद्यान ते भोसले हॉस्पिटल बेलबाग, उचगाव जकात नाका ते टेंबलाई नाका उड्डाणपूल, राधानगरी रोड ते गंगाई लॉन, स्टेशन रोड ते सायबा हॉटेल ते महावीर कॉलेज, वाईल्डर मेमोरियल चर्च ते पेडणेकर कलादालन, आरटीओ ऑफिस ते रमणमळा पोस्ट ऑफिस, शुगर मिल चौक ते बुचडे घर, संयुक्‍त महाराष्ट्र हौ. सोसायटी राजारामपुरी ते दीपा गॅस एजन्सी, वृषाली हॉटेल ते पर्ल हॉटेल, कोरगावकर हायस्कूल ते शाहू चौक, राजारामपुरी माऊली पुतळा ते गोखले कॉलेज चौक, पांजरपोळ ते शाहू मिल कॉलनी, पांजरपोळ ते यादवनगर मेन रोड, फुलेवाडी संपूर्ण बस रोड, गुजरी कॉर्नर ते रंकाळा स्टँड ते गंगावेस ते शिवाजी पूल ते तोरस्कर चौक, दसरा चौक ते बिंदू चौक ते मिरजकर तिकटी ते आयटीआय चौक, भगतसिंग चौक ते पापाची तिकटी ते रिलायन्स मॉल, शुक्रवार गेट ते जावळाचा गणपती, आरटीओ ऑफिस ते मेरिवेदर ग्राऊंड, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस ते शुकवार गेट पोलिस चौकी, उभा मारुती चौक ते राजघाट आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.

सर्वांना विश्‍वासात घेऊन शहराची हद्दवाढ करणार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही. सर्वांना विश्‍वासात घेऊन हद्दवाढीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. निवडणुका झाल्यावर मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री यांच्याकडे हद्दवाढीसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी भूमिका राहिली आहे.

आजूबाजूची गावे शहरातील सोयीसुविधांचा लाभ घेतात; मात्र शहरात यायला नको म्हणतात. पुण्यासह इतर शहरांची हद्दवाढ झाल्याने त्यांचा विकास झाला आहे. 2016 रोजी हद्दवाढीसाठी विधानभवन परिसरात आमरण उपोषण केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीच्या प्रस्तावावर सही करतो, असे सांगितल्याने आपण उपोषण सोडले. मात्र, ऐनवेळी काही जणांनी विरोध दर्शविल्याने हद्दवाढ अद्याप होऊ शकली नाही.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्री मोठ्या मनाचे आहेत ते कुणाला सहसा दुखवत नाहीत. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अंडरइस्टीमेट केल्यासारखे वाटते. महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्ष मनमर्जी कारभार करतायेत याची कल्पना शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्र आले. त्यांनी शिवसेनेला बाजूला केले. या सर्व गोष्टींची माहिती पक्षप्रमुखांना देणार आहे. पक्षप्रमुख जो आदेश देतील तो मानला जाईल.

Back to top button