बालगृहातील मुलांना वाचता येईना, गणित जमेना!

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : कोरोनामुळे दीड-दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. प्रत्यक्षात ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. परिणामी, बालगृहातील पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, गणित सोडविता येत नसल्याचे वास्तव स्पष्ट झाले आहे. ‘डाएट’च्या पडताळणीतून ही धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या समता विभागाने बालगृहातील बालकांची शैक्षणिक गुणवत्ता आणि स्तर तपासण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागाच्या 19 नोंदणीकृत संस्था आहेत. यात बालगृह, शिशुगृह, खुले निवारागृह आणि विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी निरीक्षणगृह, विशेष गृह यांचा समावेश आहे. संस्थेत 1 ली ते 8 वीचे 175, तर 9 वी ते 12 वीपर्यंतचे 163 असे 338 विद्यार्थी आहेत.

गेल्यावर्षी 29 सप्टेंबर रोजी बालगृहातील 1 ली ते 8 वीच्या 175 मुलांचा भाषा आणि गणित विषयाचा अध्ययन स्तर तपासला गेला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत भाषा व गणित विषय अध्ययन स्तर टप्पे विचारात घेण्यात आले. 1 ते 15 ऑक्टोबरला लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष अध्ययन स्तर पडताळणी झाली. ‘डाएट’ने सर्व माहिती संकलित करून विश्‍लेषण केले.

त्यानुसार पहिलीच्या वर्गातील 12 पैकी भाषेत 6 विद्यार्थ्यांना शब्द, तर गणित विषयात 12 पैकी 5 विद्यार्थ्यांना बिनहातच्याची बेरीज येत नाही. दुसरीच्या 5 पैकी 4 विद्यार्थ्यांना भाषा विषयाचे वाचलेले समजत नाही. गणितात 5 पैकी 4 विद्यार्थ्यांना बिनहातच्याची बजाबाकी करता येत नसल्याचे दिसून आले. तिसरीचे 18 पैकी 17 विद्यार्थी भाषा विषय नीट वाचू शकत नाहीत. गणित विषयात 18 पैकी 18 विद्यार्थ्यांना भागाकार जमत नाही. चौथीच्या 9 पैकी 6 विद्यार्थ्यांचा भाषा विषयाचा वाचन स्तर कच्चा आहे. गणितात 9 पैकी 9 विद्यार्थ्यांना भागाकारच येत नसल्याची पडताळणीतून माहिती पुढे आली आहे.

5 वीच्या 20 पैकी भाषेत 18 विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन, गणित विषयात 20 पैकी 18 विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही. 6 वीच्या 38 पैकी 30 विद्यार्थ्यांना भाषा विषय वाचता येत नाही. गणित विषयात 38 पैकी 30 विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही. 7 वीच्या 32 पैकी 15 विद्यार्थ्यांना भाषा विषयाचे वाचन जमत नाही.

गणित विषयात 32 पैकी 17 विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही. 8 वी च्या वर्गातील 41 पैकी 13 विद्यार्थ्यांना भाषा वाचन, तर गणित विषयात 41 पैकी 21 विद्यार्थ्यांना भागाकार करणे अवघड जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

Exit mobile version