ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ : खंडपीठप्रश्‍नी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट | पुढारी

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ : खंडपीठप्रश्‍नी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : सहा जिल्ह्यांतील पक्षकार, वकिलांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यंत गरजेचे आहे. न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापुरात खंडपीठ स्थापनेसाठी सकारात्मक अहवाल दिला होता. यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणाने सध्या भेट होऊ शकणार नसली, तरी लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी शासकीय विश्रामगृह येथे मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. 35 वर्षांपासून खंडपीठाचा प्रश्‍न प्रलंबित असून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे व विद्यमान सदस्य अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी केली. कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे, याकरिता राजकीय शक्‍ती लावून खंडपीठ स्थापनेच्या विषय मार्गी लावावा, अशी विनंतीही सदस्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी झाल्यानंतर मी स्वतः पुढाकार घेऊन सहा जिल्ह्यांतील सर्व राजकीय नेत्यांची कमिटी घेऊन याबाबत निवेदन देऊन पाठपुरावा करतो, असे आश्‍वासन यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीष खडके, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर चव्हाण, कोल्हापूरचे माजी महापौर व खंडपीठ नागरी कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर मारुतराव कातवरे, सचिव विजयकुमार ताटे-देशमुख, सहसचिव संदीप चौगुले, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, प्रशांत चिटणीस, अजित मोहिते यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Back to top button