आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपची मदत क्षीरसागर विसरले काय? | पुढारी

आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपची मदत क्षीरसागर विसरले काय?

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन विधानसभेच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने केलेली मदत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर विसरले काय, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी क्षीरसागर यांच्या टीकेला उत्तर देताना रविवारी केला.

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने विश्‍वासघात केल्यामुळे आपला पराभव झाला, असे सांगत शनिवारी पत्रकार बैठकीत त्यांनी भाजपवर निशाना साधला होता. दरम्यान, रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी क्षीरसागर यांच्या त्या वक्‍तव्याचा समाचार घेत शिवसेनेवर तोफ डागली.

आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, 2009 ला मिरज येथे मोठी दंगल झाली. या दंगलीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला सहा जागा मिळाल्या. आपण 2019 ला कोथरुड विधानसभा निवडणूक लढवत असतानादेखील क्षीरसागर यांच्या विजयासाठी प्रयत्न केले; पण येथील कोल्हापूर उत्तरच्या उमेदवाराचा पराभव झाला; पण हा पराभव भाजपमुळे झाला म्हटले जाते. मग, 2009 आणि 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत जो विजय मिळाला, त्यावेळी आम्ही बरोबर नव्हतो का? तो विजय कोणामुळे झाला, हे क्षीरसागर विसरतात का, असा सवालही पाटील यांनी केला.

भाजपकडून उमेदवार निवडण्यासाठी सर्व्हे सुरू

‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक लढविण्यासाठी भाजपने जयश्री जाधव यांना विचारणा केली होती; पण त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविणार, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने ही निवडणूक लढविण्याबाबत अंदाज घेण्यासाठी सर्व्हे सुरू केला आहे. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार निवडण्यासाठी पक्षाने 13 जणांची कमिटी नियुक्‍त केली आहे. सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर ही कमिटी त्याचा अभ्यास करेल. त्यातून कोणाला उमेदवारी द्यावयाचे हे ठरेल, असेही आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Back to top button