कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ : शिवसेना लढणार की बाय देणार! | पुढारी

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ : शिवसेना लढणार की बाय देणार!

कोल्हापूर ; सतीश सरीकर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून अपवाद वगळता शिवसेनेच्या उमेदवारानेच या ठिकाणी बाजी मारली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नसली, तरी रणधुमाळी सुरू झाली आहे. कै. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्‍चित आहे. परिणामी, शिवसेना पोटनिवडणूक लढणार की बाय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कै. जाधव हे काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे आघाडी धर्मानुसार कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकासाठी ही जागा काँग्रेसला सोडण्याची शक्यता आहे. परंतु, जिल्ह्यातील राजकारण पाहता महाविकास आघाडीत फूट पडल्याची स्थिती आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताब्यातून गोकुळ दूध संघ काढून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकसंधपणे लढली. त्यात महाविकास आघाडी यशस्वीही झाली. परंतु; स्वीकृत संचालक नियुक्‍तीवेळी दस्तुरखुद्द पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे नाव सुचवूनही काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना विरोध केला. त्याचे शल्य जिल्ह्यातील शिवसेना नेतेमंडळींना आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने थेट भाजपसोबत संधान बांधले. काँग्रेस नेते व पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला सोबत घेतले. परिणामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप अशी आघाडी झाली.

शिवसेनेने जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध दंड थोपटले. गोकुळच्या निवडणुकीत गळ्यात गळे घालून प्रचार करणार्‍या नेत्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. चुरशीने लढत देऊन शिवसेना आघाडीने तीन जागांवर विजय मिळविला. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीपासून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अंतर पडत गेले आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ यावर 1990 पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. 1995 व 1999 असे सलग दोनवेळा सुरेश साळोखे यांनी शिवसेनेतून विजय मिळविला. 2004 मध्ये काँग्रेसच्या मालोजीराजे यांनी साळोखे यांचा पराभव करून शिवसेनेची हॅट्ट्रिक रोखली. 2009 मध्ये राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकविला.

2014 मध्येही क्षीरसागर यांनी विजयी पताका कायम फडकवत ठेवली. 2019 मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी क्षीरसागर यांचा पराभव करून हॅट्ट्रिक रोखली. शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने मूळचे भाजपचे असलेले चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवून विजय मिळवला. शिवसेनेचा बालेकिल्‍ला असल्याने राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी या मतदारसंघावर हक्‍क सांगितला आहे.

आदेशाची प्रतीक्षा

सद्यःस्थितीत जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. जिल्हा बँकेच्या राजकारणाचे तीव्र पडसाद यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी एकत्र राहील. शिवसेना स्वतंत्रच राहण्याची शक्यता आहे. परंतु, ‘मातोश्री’वरून येणारा आदेश शिवसेनेच्या नेत्यांना बंधनकारक राहील. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना सूचना केल्या, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेची मने जुळणार का, असा प्रश्‍न आहे.

Back to top button