कोल्हापूर जिल्हा बँक : काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे मिळाले शिवसेना-भाजपला बळ! | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक : काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे मिळाले शिवसेना-भाजपला बळ!

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (कोल्हापूर जिल्हा बँक) निवडणुकीचे कवित्व संपता संपत नाही. या निवडणुकीत भाजपला बळ मिळाल्याचे तर शिवसेनेला एकवटण्याची संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

खरे तर महादेवराव महाडिक यांचे वारसदार म्हणून माजी आमदार अमल महाडिक जिल्हा बँकेत निवडून येणारच होते. मात्र भाजपचे सहयोगी सदस्य आमदार विनय कोरे यांनी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. तसेच भाजपचे दुसरे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांना सत्तारूढ आघाडीतून उमेदवारी देण्यास भाग पाडले.

यातून सत्ताधारी आघाडीवर भाजपशी युती केल्याचा आरोप झाला. तर राज्यात महाविकास आघाडी असून कोल्हापुरात शिवसेनेला काँग्रेस – राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याचा आरोपही सहन करावा लागला. त्यामुळे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाविकास आघाडी, तर कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशी नवीनच आघाडी असा प्रयोग झाला.

कोल्हापूर जिल्हा बँक मध्ये वारणेचे सर्वेसर्वा विनय कोरे निवडून येणारच होते. मात्र त्यांनी ज्यांच्यासाठी आग्रह धरला ते दुसरे भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे पराभूत झाले. तो पराभव कोरेंच्या जिव्हारी लागला आहे. मात्र यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्ह्यात अस्तित्व शोधणार्‍या भाजपला संधी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचा सर्वाधिक फायदा उठवला तो शिवसेनेने. अनेक गटांत विखुरलेली शिवसेना ही खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आली.

अर्थात फुटीचे ग्रहण तिथेही लागले. कारण शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने या शिवसेनेच्या सदस्य असून सत्ताधारी आघाडीतून निवडून आल्या. त्यांनीही निवडून आल्यानंतर आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले. आरोग्य राज्यमंत्री व शिवसेनेचे सहयोगी सदस्य राजेंद्र पाटील हेही सत्ताधारी आघाडीतून निवडून आले.

या सार्‍या घडामोडीत संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील-सरूडकर, सुरेश साळोखे, राजेश क्षीरसागर, संजय पवार, विजय देवणे हे एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर आले. अनेक गटांत विखुरलेली शिवसेना जिल्हा बँकेच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आली.

संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आणि अर्जुन आबिटकर हे तीन शिवसेनेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांच्या सत्कार कार्यक्रमात संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी यापुढे शिवसेना मागणार नाही तर देण्याच्या भूमिकेत असेल, असे सांगून शिवसैनिकांना तलवारी म्यान करू नका, असा संदेश दिला.

तर संजय मंडलिक यांनी ‘आमचं ठरलंय म्हणून आम्हाला गृहीत धरताय का?’ असा सवाल करत आता ‘आमचं नवीन ठरलंय, ते टोकाला नेणारच’, असा इशारा जिल्हा बँकेतील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांना दिला. शिवसेनेला ऐक्याचे बळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भाजपला सोबत घेण्याच्या कृतीने मिळाल्याची चर्चा सुरू झाली. त्याचवेळी भाजपला संधी मिळणारच होती. ती पॅनेलमध्ये घेऊन सत्ताधार्‍यांनी शिवसेनेचा रोष ओढवून घेत त्यांना ताकद दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Back to top button