बिटकॉईन मायनिंग मशिन च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा | पुढारी

बिटकॉईन मायनिंग मशिन च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा

कोल्हापूर ; गौरव डोंगरे : बिटकॉईन मायनिंग मशिन प्रतितास पैसे मिळवते… गुंतवणूक केलेल्या रकमेतून मशिन भाडेतत्त्वावर देता येते… यातून गुंतवणुकीतील 5 टक्के रक्कम दररोज परतावा म्हणून मिळेल… एकदाच रक्कम गुंतवा आणि आयुष्यभर कमाई करा… या आमिषांना भुलत लाखो रुपयांची गुंतवणूक करणारे सध्या हवालदिल बनले आहेत. ‘केएनसी अ‍ॅप’द्वारे ही कंपनी चालविणारी ‘अलिया’ अचानक संपर्कहीन बनल्याने जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधींची रक्कम अडकल्याचे समोर येत आहे.

‘केएनसी चेन’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे जिल्ह्यातील अनेकांना बिटकॉईन मायनिंग मशिन खरेदीचे आमिष दाखविण्यात आले. या मशिनची किंमत लाखोंच्या घरात असल्याने गुंतवणूकदारांचे ग्रुप बनवून त्यांच्यामध्ये अशी मशिन कंपनी खरेदी करेल, असे सांगण्यात आले. हे मशिन भाडेतत्त्वावर देऊन प्रतितास जितकी कमाई करेल त्यापैकी काही हिस्सा गुंतवणूकदारांना दिला जाईल. तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेच्या 5 टक्के रक्कम दररोज परतावा म्हणून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

फायदा मिळाल्याने वाढला विश्वास

मोबाईल लिंकद्वारे ‘केएनसी’ या मोबाईल अ‍ॅपवर अनेकांनी पैसे गुंतविण्यास सुरुवात केली होती. संबंधित कंपनीचे कोठेही कार्यालय नसताना केवळ अलिया नावाच्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवत अनेकांनी एक लाख ते 10 लाखांची रक्कम गुंतवली. या गुंतवणुकीतून परतावा म्हणून अनेकांच्या खात्यातही रक्कम येण्यास सुरुवातही झाली. डिसेंबर महिन्यात 1 लाख गुंतवलेल्या व्यावसायिकाला त्याच महिन्यात 1 लाख 30 हजारांचा परतावा मिळाला. याची माहिती त्याने आपल्या नातेवाईक, मित्रांना सांगत ही गुंतवणूक चौपट ते पाचपट वाढवली.

दुसर्‍या दिवशी खात्यात पैसे

गुंतवणूक केलेल्या रकमेतून संबंधित गुंतवणूकदाराला कोणते मशिन हवे, याची विचारणा करत मशिनचे फोटो संबंधित अ‍ॅपवर पाठविले जात होते. यातून तो गुंतवणूकदार स्वत: मशिन पसंद करत होता. जितके महागडे मशिन तितकी जास्त गुंतवणूक, असा फंडा वापरण्यात आला. यामुळे गुंतवणुकीच्या रकमाही मोठ्या होत गेल्या. या प्रक्रियेनंतर लगेचच अ‍ॅपमध्ये पॉईंट जमा होत. तर दुसर्‍या दिवशी बँक खात्यावर 5 टक्के रक्कम जमा होऊ लागल्याने अनेकांचा विश्वास ठाम झाला.

‘अलिया’ झाली संपर्कहीन

जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचे काही व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनविण्यात आले होते. याची ग्रुप अ‍ॅडमिन म्हणून अलिया ही काम पाहत होती. ती दररोज गुंतवणूकदारांना वेळवेगळ्या स्कीमची माहिती देत होती. मात्र, 2 जानेवारीपासून ती अचानक संपर्कहीन बनल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. यातील बहुतांश व्यवहार हे फोन पे, गुगल पे, ओशन पे, जी. एस. पे, के. के. पे यासारख्या मोबाईल वॉलेटच्या माध्यमातू झाले आहेत.

शेवटचा हात मारलाच

31 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान गुंतवणूकदारांना अचानक फोन आले. तुमच्या नावाचे आणखी काही गुंतवणूकदार नोंद झाले आहेत. तुमचे खाते सुरक्षित करण्यासाठी 6 हजार 500 रुपये कंपनीला पाठवा. आपली लाखोंची रक्कम अडकण्याच्या भीतीने प्रत्येक गुंतवणूकदारांनी ही रक्कम पाठवली; पण यानंतर दुसर्‍या दिवशीपासून अलियासह इतर अ‍ॅडमिन बेपत्ता झाल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.

Back to top button