कोल्हापूरला रेल्वे मार्गाने पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर जोडणार | पुढारी

कोल्हापूरला रेल्वे मार्गाने पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर जोडणार

कोल्हापूर ; अनिल देशमुख : कोल्हापूर-कलबुर्गी अशी नवी रेल्वे सुरू होणार आहे. मिरज-सोलापूर या सुपरफास्ट एक्स्प्रेसचा विस्तार कोल्हापूर ते कलबुर्गी असा करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे लवकरच ही रेल्वे दररोज धावणार आहे. या नव्या रेल्वेमुळे कोल्हापूरशी पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर ही तीर्थक्षेत्रे थेट रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत.

मिरज-सोलापूर अशी सुपरफास्ट

एक्स्प्रेस सध्या सुरू आहे. याच गाडीचा सोलापूरपासून पुढे कलबुर्गीपर्यंत आणि मिरजेपासून पुढे कोल्हापूरपर्यंत विस्तार केला जाणार आहे. खासदारांसह सल्लागार समितीच्या सदस्यांची आणि प्रवाशांची याबाबत मागणी होती, त्यानुसार सोलापूर विभागाने या रेल्वेला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव पुणे विभागाकडे मंजुरीसाठी आला आहे. यानंतर तो रेल्वे बोर्डाला सादर होईल. फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष ही गाडी सुरू होईल, अशी शक्यता आहे.

कोल्हापूर-सोलापूर मार्गावर यापूर्वी दिवसा धावणारी रेल्वे बंद करून रात्री सोडण्यात येत होती. यामुळे ही गाडी प्रवाशांसाठी गैरसोयीचीच होती. त्यातच लॉकडाऊनपासून बंद केलेली ही गाडी अद्याप सुरू नाही. रात्री उशिरा सुटून पहाटे लवकर सोलापुरात पोहोचणार्‍या या गाडीमुळे सोलापूरसह पंढरपूरला जाणार्‍यांनाही ही गाडी सोयीची नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर नव्याने सुरू होणारी कोल्हापूर-कलबुर्गी रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

चार तीर्थक्षेत्रे जोडली जाणार

या गाडीमुळे कोल्हापूर-पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर ही चार तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. कोल्हापुरातून पंढरपूर, अक्कलकोटसह गाणगापूरला जाणार्‍या भाविकांची संख्या प्रचंड आहे. या मार्गावर थेट रेल्वे नव्हती. या रेल्वेमुळे भाविक, पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. यासह कोल्हापुरात येणार्‍या भाविक, पर्यटकांचीही संख्या वाढणार आहे.

Back to top button