‘डीएलएड’ महाविद्यालयांना घरघर! | पुढारी

‘डीएलएड’ महाविद्यालयांना घरघर!

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : डीएलएड (डीएड) अभ्यासक्रम प्रथम वर्षाचे यंदा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक प्रवेश झाले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यार्थी संख्या रोडावल्याने कॉलेजची संख्या 44 वरून 18 वर पोहोचली आहे. त्यामुळे ‘डीएलएड’ महाविद्यालयांना घरघर लागल्याची परिस्थिती आहे.

मागील दहा वर्षांत त्यावेळेच्या डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन अनेकांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तेव्हा डीएडला प्रवेश मिळणे खूपच अवघड होते. 2012 नंतर शिक्षक भरतीवर शासनाने बंदी घातली आहे. शिक्षक होण्यासाठी डीएलएडबरोबर टीईटी, अभियोग्यता चाचणी परीक्षा देणे राज्य सरकारने बंधनकारक केले. परिणामी, बहुतांश डीएलएड महाविद्यालयांमधील प्रवेश हळूहळू कमी झाले. नुकतेच राज्य शासनाने राज्यातील पाच अध्यापक महाविद्यालये बंद केल्याने डीएलएड महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

राज्यात डीएलएडची 654 महाविद्यालये असून 35 हजारांहून अधिक प्रवेश क्षमता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 18 महाविद्यालये असून प्रवेश क्षमता 1,127 आहे. रुकडी, गारगोटी, वडणगे, पेटाळा (कोल्हापूर), ताराराणी विद्यापीठ, सन्मित्र डीएड कॉलेज अशी अनुदानित कॉलेज आहेत. कागल, गडहिंग्लज, महागाव, औरवाड, अब्दुललाट, तळसंदे, नरंदे, तारळे, कोतोली या ठिकाणी विनाअनुदानित डीएलएड कॉलेज आहेत.

गतवर्षी ऑगस्ट ते जानेवारीअखेरपर्यंत चार टप्प्यात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. विशेष फेरी घेण्यात आली. यात 1,127 पैकी 600 हून अधिक प्रवेश झाले आहेत.

गुणवत्ता, सुविधांची उपलब्धता असणार्‍या महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के प्रवेश झाले आहेत. याउलट काही विद्यालयांचे व्यवस्थापन कमी पडत आहे, त्या ठिकाणी सुविधांचा अभाव, प्रशिक्षित स्टाफ नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविल्याची माहिती पुढे आली आहे. 2017-18 रोजी वारणा डीएड कॉलेजने बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

त्यानंतर नॅशनल कौन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशनने (एनसीटीई) नव्याने प्रस्ताव मागविणे व डीएलएड महाविद्यालयांना मान्यता देण्याचे बंद केले आहे.

Back to top button