कोल्हापूर : हसूरचंपू येथे अ‍ॅग्रो केमिकल्स कारखान्याला आग - पुढारी

कोल्हापूर : हसूरचंपू येथे अ‍ॅग्रो केमिकल्स कारखान्याला आग

जरळी : पुढारी वृत्तसेवा

हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रामकृष्ण ऍग्रो केमिकल्स कारखान्याला आग लागली. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत नुकसान झाले. कारखान्यातील कच्च्या मालासह इतर साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये काजूच्या टरफलापासून तेल करण्याचा कारखाना आहे. काल बुधवारी दोनशे टन कच्चा माल आणला होता. पहाटे टरफलाच्या ढिगार्‍यावर विजेची ठिणगी पडून आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी प्रचंड धुक्यामुळे नेमके काय झाले, हे समजले नाही. बाजूच्या दुसर्‍या शेडमध्ये कामगार गाढ झोपेत होते. आगीमुळे शेडचा पत्रा तापल्याने कामगारांना जाग आली. गोंधळामुळे लोक गोळा झाले. गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

दोनशे टन कच्च्या मालासह, प्लॅनल बोर्ड, वीज पंप यासह अन्य साहित्य जळून खाक झाले. टरफलाचा ढीग मोठा होता. त्यामुळे आग लवकर आटोक्यात येत नव्हती. आगीचे रौद्ररुप पाहता कागलमधील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. सकाळी चार वाजलेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत जवानासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.

जेसीबी चालक विकी शिंदे यांनी धाडस करून जेसीबी शेडमध्ये नेऊन ढीग उपसून टाकल्याने अखेर आग आटोक्यात आली. सुदैवाने तेल टाकीपर्यंत आग पोहोचली नाही अन्यथा मोठी हानी झाली असती. संतोष तेली, उद्योजक संतोष शिंदे, सचिन शेंडगे, गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले.

Back to top button