जयश्री जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी : चंद्रकांत पाटील | पुढारी

जयश्री जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका होत्या. भाजपला जागा मिळाली नाही म्हणून चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, यासाठी आग्रह धरणार असल्याचे भजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

जयश्री जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी

पाटील म्हणाले, पोटनिवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपची कोअर कमिटी आहे. जयश्री जाधव भाजपच्या नगरसेविका होत्या. चंद्रकांत जाधव यांचे बंधू हे देखील भाजपचे नगरसेवक होते. एकाच घरात भाजपचे दोन नगरसेवक आणि भाजपला जागा न मिळाल्?याने चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेस पक्षातून कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढविली. पहिल्यापासून चंद्रकांत जाधव हे भाजप व आरएसएसशी निगडित होते. त्यामुळे जयश्री जाधव यांची येत्या दोन दिवसांत भेट घेऊन त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा आग्रह करणार आहे. त्यांनी जर आमचा प्रस्ताव नाकारून काँग्रेसकडूनच निवडणूक लढवणार, असे सांगितले तर पोटनिवडणूक लढविण्याबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल.

मुश्रीफांचे ज्ञान कागलच्या बाहेर नाही

महाराष्ट्रातील निर्बंध केंद्र सरकारने घातले, या ना. हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर पाटील म्हणाले, मुश्रीफांचे ज्ञान कागलच्या बाहेर नाही. महाराष्ट्राइतके कठोर निर्बंध अन्य राज्यांत नाहीत. हे निर्बंध केंद्र सरकारने घातलेले नाहीत. एकीकडे मुंबईचे महापालिका आयुक्त म्हणतात की, कोरोना संपण्याच्या दिशेने चालला आहे. दोन डोस घेतलेल्यांसाठी तो घातक नाही. हॉस्पिटलमधील रुग्णसंख्याही कमी आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आवश्यकता नाही. त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्रीची संचार बंदी लागू करतात. यामुळे फेरीवाल्यांच्या पोटावर पाय आला आहे.

…तर मंडलिकांना याचा फायदा होईल

जिल्हा बँकेच्या राजकारणाबाबत पाटील ?हणाले, एखाद्याला जवळ करून फसवणे ही त्या पक्षाची परंपरा आहे. जिल्हा बँकेत मूठभर नेत्यांचे वर्चस्व आहे. जिल्हा बँकेत मर्यादित ताकत होती. त्यामुळे चराटी, आवाडे यांना पाडण्याचे राजकारण करून काही मिळणार नाही. या जनमी केलेले पाप याच जन्मी फेडायला लागणार आहे. भाजपचे अमल महाडिक व दोन सहयोगी सदस्य आहेत. भविष्यात खा. संजय मंडलिक काही करणार असतील तर त्यांना या सहयोगी सदस्यांचा उपयोग होईल.

शरद पवारांना मैदानात उतरावे लागले

एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मैदानात उतरावे लागत आहे. यावरून शिवसेनेचे नेतृत्व कमी पडत आहे हे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांना पवार यांचे मार्गदर्शन घ्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसल्याने कोणीतरी पर्याय असावा म्हणून शरद पवारांची तयारी सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

भाजपला नक्‍की यश मिळणार

गोवा निवडणुकीत भाजपला यश मिळणार नाही, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल विचारता पाटील म्हणाले, राऊत विश्लेषण करू शकतात. प्रत्यक्षात काय होते हे लवकरच समजणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वेळा अन्य राज्यांत निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या किती वेळा डिपॉझिट बुडाले, किती डिपॉझिट जप्त झाले यातून कोणताही बोध न घेता पुन्हा एकदा प्रयत्न करू, असे म्हणतात; पण पुन्हा तोंडावर पडतात. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल.चंदीगडला भाजपचा महापौर झाला आहे. अन्य राज्यांइतके बहुमत मिळेल इतकी निवडणूक सोपी नाही; पण आम्ही चांगला लढा देऊ, असे पाटील यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

Back to top button