कोल्हापूरकरांना हुडहुडी! | पुढारी

कोल्हापूरकरांना हुडहुडी!

कोल्हापूर ; आशिष शिंदे : उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे राज्यात गारठा वाढला आहे. याचा तडाखा कोल्हापूरला बसला आहे. शहरात गेल्या पाच वर्षांतील जानेवारी महिन्यातील नीचांकी 12.8 अंश सेल्सिअसची नोंद बुधवारी झाली. हवेतील गारठा दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोल्हापूरकरांना आणखी हुडहुडी भरणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अहवालानुसार, 7 जानेवारी 2017 नंतर प्रथमच कोल्हापूरचा पारा 12 अंशांपर्यंत खाली आला आहे. यामुळे कोल्हापूरकर अक्षरश: गारठले आहेत. पुढील दिवसांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज असून, ढगाळ वातावरणासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे.

दिवसाही बोचरे वारे

दिवसभर ऊन असले, तरी हवेत बोचरी थंडी होती. यामुळे दिवसभरही अनेकांवर स्वेटर, कानटोप्या आदी उबदार कपडे घालण्याची वेळ आली होती. सायंकाळनंतर हवेतील गारठा आणखी वाढत गेला. यामुळे सायंकाळनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ तुुलनेने कमी झाली. सायंकाळनंतर स्वेटर्स, जर्किन्स, कानटोप्या, हातमोजे अशी उबदार कपडे घालूनच बहुतांशी नागरिक घराबाहेर पडलेले दिसत होते.

गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरचा पारा सातत्याने घसरत आहे. आठवडाभरात हा पारा 17 अंशांवरून 12 अंशांपर्यंत घसरला आहे. यामुळे सकाळी व रात्री हाडे गोठवणारी थंडी जाणवत असून, घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. ‘आयएमडी’च्या अहवालानुसार, गेल्या दहा वर्षांमध्ये (2012-21) जानेवारी महिन्यात पारा 12 अंशांच्या खाली कधीच आलेला नाही.

कोल्हापूरमध्ये 60 वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. 6 जानेवारी 1962 मध्ये पारा 8.7 अंशांपर्यंत खाली घसरल्याची नोंद आहे. गतवर्षी थंडी सुरू होण्याची प्रतीक्षा शहरवासीय करत होते. मात्र, वातावरणीय बदलांमुळे थंडीचा कडाका कमी जाणवला होता. यंदा मात्र थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे.

कोल्हापूर शहरामध्ये वेदर मॉनिटरिंग सिस्टीम नसल्याने तापमानाची रिअल टाईम माहिती मिळत नाही. दर 24 तासांनी शहरातील वातावरणीय बदलाचा अहवाल प्रकाशित केला जातो.

Back to top button