मेहता पब्लिशिंग चे सुनील मेहता यांचे निधन | पुढारी

मेहता पब्लिशिंग चे सुनील मेहता यांचे निधन

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील अनिल मेहता (वय 56) यांचे बुधवारी पुणे येथे निधन झाले. प्रकाशक अनिल मेहता यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सुनील मेहता यांची गेले काही दिवस तब्येत ठीक नव्हती. किडनी स्टोनवरील आजारासाठी पुना हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. दोन दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता त्यांचे निधन झाले.

सुनील मेहता यांनी प्रकाशन व्यवसायाला आधुनिकतेचे रूप दिले. मराठीतील प्रसिद्ध साहित्यिकांच्या कादंबरी, कवितासंग्रह, आत्मचरित्र, ललित लेखन, इतिहासावर आधारित साहित्य प्रकाशित केले. कुसुमाग्रज ते चेतन भगत अशा नामवंत साहित्यिकांचे साहित्य वाचकांना उपलब्ध करून दिले. दर्जेदार पुस्तकनिर्मिती केली.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार साहित्य अनुवाद स्वरूपात मराठी वाचकांच्या हाती दिले होते.

वाचन संस्कृती वाढविणारा प्रकाशक हरपला, अशा शब्दांत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी भावना व्यक्‍त केल्या.

प्रकाशन विश्‍वातील धडाडीचे व्यक्‍तिमत्त्व

मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे माजी कार्यवाह सुनील मेहता हे मराठी प्रकाशन विश्‍वातील धडाडीचे व्यक्‍तिमत्त्व होते. मराठी प्रकाशन विश्‍वात आंतरराष्ट्रीय पद्धतीने कामकाज चालवण्याची पद्धत मेहता त्यांनी रूढ केली. अनेक दिग्गजांसह नवोदित लेखकांना त्यांनी लेखनाची संधी दिली. त्यांनी प्रकाशन संस्थेद्वारे अनेक पुस्तके प्रकाशित करून लेखकांना व्यासपीठ दिले.

प्रकाशन व्यवसायातील सुरुवात…

1976 साली वडील अनिल मेहता यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या संस्थेची सूत्रे 1986 साली सुनील मेहता यांच्याकडे आली. अल्पावधीतच मेहता यांनी संस्थेला नावारूपास आणले. मराठीतील दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनासोबतच विविध भाषांमधील पुस्तकांचे अनुवाद मराठीत आणणार्‍या सुनील मेहता यांनी संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.

प्रकाशन व्यवसायातील कारकीर्द…

आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, फ्रेडरिक फोरसाइथ, रॉबिन कुक, अ‍ॅलिस्टर मॅक्लिन, जॉन ग्रिशॅम, इयान फ्लेमिंग, डॅन ब्राऊन, डेबोरा एलिस, ली चाइल्ड झुम्पा लाहिरी यांचे साहित्य मराठीत आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. तर तस्लिमा नसरीन, सुधा मूर्ती, अरुण शौरी, खुशवंत सिंग, चेतन भगत, एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गुलजार, दीप्ती नवल, अरुंधती रॉय, ओशो, किरण बेदी अशा लेखकांचे साहित्य त्यांनी मराठीत आणले.

टीबीसी या अभिनव संकल्पनेतून त्यांनी हे अनुवाद मराठी वाचकांपर्यंत पोहचविले आहेत. मराठीतील वि. स. खांडेकर, रणजित देसाई, व. पु. काळे, विश्‍वास पाटील, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, आनंद यादव आणि व्यंकटेश माडगुळकर अशा दिग्गज लेखकांचे साहित्य दर्जेदार रूपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मेहता यांनी केले.

Back to top button