कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; पण धोका नाही | पुढारी

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; पण धोका नाही

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट वाढत आहे. बाधितांचे प्रमाण वाढत असले, तरी धोका नाही, असेच चित्र सध्या आहे. कारण, बाधित रुग्णांपैकी तब्बल 90.82 टक्के रग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी बहुतांश जणांना लक्षणेच नाहीत, तर उर्वरित रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यात दुसर्‍या लाटेची तीव्रता होती. मे महिन्यात जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 20.6 पर्यंत गेला होता. तत्पूर्वी पहिल्या लाटेत हाच सरासरी रेट 28.6 पर्यंत होता. दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षाही कमी होता. तिसर्‍या लाटेत दहा दिवसांत जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यावरून 20 टक्क्यांपर्यंत गेला आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 12.39 टक्के इतका राहिला आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली, तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणार्‍या रुग्णांचे प्रमाण हे केवळ 9.18 टक्के इतके आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या 1396 इतकी आहे. त्यातील केवळ 135 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित 1,261 रुग्ण घरीच आहेत. जिल्ह्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

लक्षणे नसल्यास चाचणी नाही

कोरोना बाधित रुग्णांच्या हायरिस्क (अति जोखीम) कॉन्टॅक्टमधील (संपर्कांतील) व्यक्‍तींची तपासणी केली जात होती. मात्र, हायरिस्क कॉन्टॅक्ट असूनही संबधितांना लक्षणे नसतील, तर त्यांची कोरोना चाचणी केली जाणार नाही.

घाबरू नका; पण काळजी घ्याच

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी काळजीचे कारण नाही. घाबरू नका; पण काळजी घ्या. गर्दीची ठिकाणे टाळा, नियमांचे पालन करा. मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर यांचा वापर आणि लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात 40 टक्के बेडची तयारी

जिल्ह्यात तिसर्‍या लाटेत ‘पिक’ कालावधीत सक्रिय रुग्णसंख्या 24 हजारांपर्यंत जाऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार 40 टक्के बेडची तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालये, कोरोना केअर सेंटर आदींद्वारे 9 हजार 400 बेड तयार ठेवण्यात येणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, पहिल्या आणि दुसर्‍या लाटेसारखी बेडची आवश्यकता फार भासणार नाही. तशी परिस्थितीही निर्माण होणार नाही. मात्र, फेबुवारी महिन्यात तिसर्‍या लाटेची तीव्रता राहण्याची शक्यता आहे. यासर्व पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ही प्रत्येक तालुक्यात बेडची तयारी करण्यात येत आहे.

दररोज 184 टन ऑक्सिजनची निर्मिती

जिल्ह्यात दररोज 184 टन ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. यापैकी 157.52 टन ऑक्सिजन हा ‘एलएमओ’, तर 25.75 टन हा ‘पीएसए’ स्वरूपाचा आहे. जिल्ह्यातील 13 शासकीय रुग्णालयांत ‘पीएसए’चे 17 प्लँट उभारण्यात येत आहेत. यापैकी 14 प्लँट पूर्ण झाले आहेत. उर्वरित प्लँटही येत्या काही दिवसांत पूर्ण केले जाणार आहेत. ‘एलएमओ’ चे 11 प्लँट उभारले जाणार आहेत. यापैकी सात प्लँट उभारले आहेत. त्यातून 111.86 टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. दुसर्‍या लाटेत प्रतिदिन 54 ते 60 टन ऑक्सिजनची गरज भासत होती, जिल्ह्यात सध्या त्याच्या तिप्पट ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.

Back to top button