डॉक्टरांचे वेतन थकल्यास प्रशासनावर कारवाई | पुढारी

डॉक्टरांचे वेतन थकल्यास प्रशासनावर कारवाई

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील डॉक्टरांचे वेतन विहित कालावधीत अदा करणे आवश्यक आहे. त्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय यांनी दिला आहे.

राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील डॉक्टरांचे, विशेषतः कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या डॉक्टरांचे वेतन थकीत राहण्याच्या घटना समोर येत आहेत. कोल्हापुरातील राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन वर्षांत 3 वेळेला या घटना समोर आल्या.

कोरोना काळात पहिल्या आघाडीवर काम करणार्‍या डॉक्टरांचेच वेतन थकल्यामुळे दै. ‘पुढारी’ने यावर आवाज उठविला होता. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. नुकत्याच झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सचिवांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे डॉक्टरांच्या वेतनविषयक प्रस्ताव पाठविण्यात दिरंगाई करणार्‍या प्रशासनाला चाप बसेल, अशी अपेक्षा आहे.

गतवर्षी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने दिलेल्या निर्णयात शासकीय सेवेतील डॉक्टरांचे वेतन हा त्यांचा न्यायपूर्ण अधिकार आहे, असे नमूद करताना त्याविषयी दिरंगाई झाल्यास जेवढी दिरंगाई, तेवढ्या काळाचे व्याज अनुज्ञेय आहे, असे निकालपत्रात नमूद केले होते. या निकालाचा आधार घेऊन वेतन थकीत असलेले शासकीय सेवेतील डॉक्टर्स न्यायालयात गेले, तर व्याज अनुज्ञेय होईल. शिवाय, सरकारची नामुष्कीही होऊ शकते. सध्या या पर्यायाची चाचपणी केली जाते आहे.

डॉक्टरांची अडचण

डॉक्टर्स वेतनासाठी आंदोलनात उतरले, तर त्यांना प्रशासनाच्या रोषाला सामोरे जावे लागतेे. यामुळे बहुतेक वेळेला वेतन मिळाले नाही, तरी कंत्राटी कामावर असलेले हे डॉक्टर्स निमूटपणे काम करण्याचा मार्ग पसंत करतात. या डॉक्टरांची मूळ नियुक्तीच 4 किंवा 11 महिन्यांची असते. या कालावधीत त्यांनी जर प्रशासनाविरुद्ध काही कृती केली, तर त्यांना मुदतवाढ मिळण्यात अडचण निर्माण होते.

ज्यांनी वेतनाविना काम केले, त्यांना मुदतवाढ घेताना वरिष्ठांच्या मिनतवार्‍या कराव्या लागतात. काहींना हेतूतःही डावलले गेल्याच्या तक्रारी आहेत. यामुळेच कोल्हापुरातील कंत्राटी डॉक्टर्स वेतनविषयक अन्याय होऊनही बॅकफूटवर होते. पण सहनच होत नाही, अशी स्थिती झाल्यानंतर त्यांनी आंदोलनाची हाक दिली.

Back to top button