कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सायकलवरून शाळेला जाणाऱ्या मुलीस वाटेत अडवून 'तू मला खूप आवडतेस, मला मेसेज कर', असे म्हणून छेड काढणाऱ्यास मुलीच्या भावाने जाब विचारला म्हणून २८ जणांच्या जमावाने काठ्या, गज, कुऱ्हाड व विळ्यासारख्या हत्यारांसह मुलीच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास संभापूर (ता. हातकणंगले) येथे ही घटना घडली.
आकाश संभाजी आणुसे, अर्जुन भगवान कारंडे हे अल्पवयीन मुलीस शाळेत जाताना दुचाकी आडवी मारून वाटेत अडवून मला मेसेज केली नाहीस तर तुझ्या भावाला तुझ्याबद्दल काहीही सांगू, असे धमकावून निघून गेले. काही दिवसांनी पुन्हा दोघांनी दुचाकीवरून येत मुलीची छेड काढली. मुलीने, मी मेसेज करणार नाही, असे सांगितल्यावर, भावाला सांग, नाहीतर कोणालापण सांग, मी भीत नाही, असे म्हणत आकाश व अर्जुन निघून गेले. मुलीच्या भावाने आकाश व अर्जुन यांच्याकडे विचारणा केली असताना ते मोटारसायकल टाकून पळाले. मुलीच्या भावाने त्यांची मोटारसायकल घरात आणून लावली.
आकाश आणुसे, अर्जुन कारंडे, प्रकाश संभाजी आणुसे, सुजय संजय कारंडे, काशिनाथ कारंडे, राज माने, रोहित जगन्नाथ कारंडे, किरण रावसाहेब आणुसे, अमोल रावसाहेब आणुसे, शुभम विष्णू डांगे, कुलदीप भारत कारंडे, सुरज भारत कारंडे, अक्षय अशोक कारंडे, गौरव नामदेव कारंडे, राजवर्धन संदीप बंडगर, अंकुश शामराव कारंडे, सुरज परमेश्वर थोरात, अविनाश आकाराम कारंडे, उदय वाकसे (सर्व रा. संभापूर) व इतर ८ ते १० अनोळखी लोकांनी काठ्या, गज, कुन्हाड, विळा घेऊन घरामध्ये घुसून मुलीला व तिच्या भावाला सोडणार नाही, असा दम देत यश प्रकाश भोसले (वय १७) व तानाजी बबन भोसले यांना शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी यांच्या सासू, दीर यांना ढकलून दिले व घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. वाद सोडविण्यासाठी आलेल्या लोकांनाही मारुन गंभीर जखमी केले. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात साधना प्रकाश भोसले यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.