

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 गटांचे सदस्य आरक्षण सोमवारी काढण्यात आले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे लोकसंख्येच्या निकषानुसार चक्राणू पद्धतीने टाकलेल्या या आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले असून काहींना नव्याने संधी चालून आली आहे. काहींचे मतदारसंघ महिला राखीव झाल्यामुळे निराशा ओढवली आहे.
या आरक्षण प्रक्रियेनंतर आता इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील जि.प. व पं.स. निवडणुका महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? याच चित्र लवकरच स्पष्ट होईल.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व निवडणूक उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मायनाक भंडारी सभागृहात झालेल्या या आरक्षण सोडतीत स्वरूप कुमठेकर, यशस्वी सावंत या विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षण चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
या आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीसाठी- सुकळवाड (मालवण), जानवली (कणकवली) व शिरगाव (देवगड) हे तीन मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. यातील जानवली आणि सुकळवाड दोन मतदारसंघ महिलांसाठी तर शिरगांव अनु. जाती सर्वसाधारण साठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रर्वगा पैकी 7 मतदारसंघ महिलांसाठी राखीव तर उर्वरित 34 सर्वसाधारण मतदारसंघामधून 16 मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
जि. प. च्या 50 पैकी 3 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव. यात जानवली आणि सुकळवाड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव तर शिरगांव सर्वसाधारणसाठी राखीव.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 13 पैकी महिलांसाठी 7 जागा आरक्षित आहेत. यामध्ये पोंभुर्ले, खारेपाटण, लोरे, मणेरी, कलमठ, मळेवाड, माडखोल या नामाप्र सर्वसाधरण तर कासार्डे, नेरूर देऊळवाडा, कुणकेश्वर, घावनळे, माणगांव आणि फोंडाघाट या गट नामाप्र महिला आरक्षित झाले आहेत.
जि. प. चे सर्वसाधारण 34 गट असून यातील 16 गट महिलांसाठी राखीव आहेत. यात कळसुली, पडेल, मसुरे- मर्डे, म्हापण, बापर्डे, साटेली-भेडशी, तेंडोली, आंबोली, किंजवडे, वायरी-भूतनाथ, आंब्रड, कोकीसरे, आडवली मालडी, तुळस, ओरोस बुद्रुक व आचरा या मतदारसंघाचे समावेश आहे.
रेडी, हरकुळ बुद्रुक, उभादांडा, नाटळ, माजगांव, इन्सुली, पेंडुर, पुरळ, तळवडे, आरोंदा, आडेली, पावशी, बांदा, वेताळबांबर्डे, कोळपे, माटणे, कोलगांव आणि पिंगुळी आदी मतदार संघ सर्वसाधारण खुले आहेत.
निवडणूक आयोगाच्या सुधारित लोकसंख्या 2011 नुसार मतदारसंघ सदस्य आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यावर काही हरकती असल्यास 14 ते शुक्रवार दि. 17 ऑक्टोंबर हा कालावधी आहे. नागरिक व राजकीय पक्षांनी वरील कालावधीत आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी केले आहे.