

वेंगुर्ले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असा एकमुखी ठराव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वेंगुर्ले तालुका मासिक सभेत घेण्यात आला. वेंगुर्ला नगरपालिका निवडणूक सुद्धा स्वबळावरच लढवण्याची अशी सूचना शहरातील प्रमुख पदाधिकारी यांनी केल्याचे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेनेची मासिक सभा रविवारी झाली. या सभेनंतर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी पत्रकारांशी बोलत होते. वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, विधानसभा मतदारसंघ महिला संघटक सुकन्या नरसुले, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, संजय गावडे, उभादांडा सरपंच नीलेश चमणकर, पंकज शिरसाट, गजानन गोलतकर, दिलीप राणे, अल्पसंख्याक सेल तालुका प्रमुख रफिक बेग, नामदेव राणे, महिला तालुका संघटक साक्षी चमणकर, नेहा राणे, कोमल सरमळकर, उदय दळवी, सदाशिव दळवी, लक्ष्मीकांत राणे, रवींद्र राऊळ, गोरक्ष ठुंबरे, उपविभाग प्रमुख संजय परब, संदीप पेडणेकर, नागेश सारंग, विश्वनाथ म्हापणकर, लक्ष्मी पेडणेकर, राजश्री शेळके आदी उपस्थित होते.
बाबुराव धुरी म्हणाले, वेंगुर्ला तालुक्यात होणाऱ्या पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सक्षम व चांगले चरित्र असणारे उमेदवार देण्यात येतील. यामुळे भरघोस यश आगामी निवडणुकीत मिळेल. ज्येष्ठ मार्गदर्शक जयप्रकाश चमणकर, प्रकाश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढवण्यात येणार आहेत. वेंगुर्ला सारख्या सुसज्ज व समृद्ध तालुक्यात शांतता राहावी, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा व वेंगुर्लेचा इतिहास राखला जावा अशा प्रकारच्या उमेदवारांकडे हा नगरपरिषदेचा कारभार देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भरघोस यश उबाठा शिवसेनेला मिळेल, असा विश्वास श्री. धुरी यांनी व्यक्त केला.
माजी शहरप्रमुख अजित राऊळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या ठाकरे शिवसेना वेंगुर्ले शहरप्रमुख पदी ज्येष्ठ शिवसैनिक शैलेश परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. येत्या 2 दिवसांत शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भात शहरातील प्रमुख पाच पदाधिकारी यांची कमिटी केली जाईल व आगामी नगरपालिका निवडणुकीत उबाठा शिवसेनेचा झेंडा फडकेल, असा निर्धार या बैठकीत करण्यात आल्याचे बाबुराव धुरी यांनी सांगितले.c