कुडाळ : आपण भारतीय सैन्यदलातून बोलत आहोत. आपल्याला सैन्यदलातील सैन्यासाठी आवश्यक गणवेश शिवून घ्यायचा आहे, असा बहाणा करून कुडाळ तालुक्यातील एका टेलरिंगचे काम करणार्या व्यक्तीला 1 लाख 2 हजार रु.चा ऑनलाईन गंडा घातला. दोघांच्या खात्यावरून हा गंडा घातला असून, यातील एकाच्या खात्यातील 2 लाख रुपये रक्कम सुदैवाने वाचली.
कुडाळ तालुक्यातील टेलरिंगचे काम करणार्या एका व्यक्तीला आपल्याला सैन्यदलातील सैन्यासाठी आवश्यक गणवेश शिवून घ्यायचा आहे, असे सांगितलेे. यानंतर त्या व्यक्तीने त्या टेलर असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकाने व व्यवसाय यांचे अगदी हुबेहूब वर्णन करत विश्वास संपादन केला. यानंतर समोरील व्यक्तीने सांगितलेली सर्व प्रोसेस या टेलर व्यक्तीच्या मुलाने केली. त्याच्या बँक खात्याचेही सविस्तर वर्णन केले व त्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्या खात्यावर असलेल्या 52 हजार 200 रु. रक्कमेपैकी 52 हजार रुपये आपल्या खात्यात वळते केले. यानंतर त्याने तुमचे खाते काही कारणाने आता बंद झाले आहे. त्यामुळे दुसर्या व्यक्तीच्या व्हॉटस्अॅपवरून व्हॉटसअॅप फोन करायला सांगितला व त्याच्या खात्यावरील 50 हजार रूपये नकळत वळते केले.
दुसर्या व्यक्तीच्या खात्यात सुमारे 2 लाख 50 हजार रूपये रक्कम होती. मात्र त्याच्या खात्यतील पैसे काढण्याची मर्यादा केवळ 50 हजार रुपयेच असल्याने त्याला पुढील रक्कम वळती करता आली नाही. त्यामुळे सुदैवाने पुढील सुमारे 2 लाख रुपये रक्कम वाचली. यानंतर त्या व्यक्तीने पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्या व्यक्तीला प्रथम संबंधित बँकेत जाऊन बँक खाते बंद करण्याचा सल्ला दिला. मात्र संबंधित बँकेने सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली. एखाद्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी हे हॅकर गेल्या काही वर्षांत भारतीय सैन्य दलाच्या नावाचा वापर करून लाखोंचा गंडा घालत आहेत. याकडे सायबर क्राईम शाखेने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.