

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यापासून म्हणजेच गेेले पाच महिने पाऊस पडत आहे. आतापर्यंत (30 सप्टेंबर) जिल्ह्यात सरासरी 2751.1 मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी 954.3 मि.मी. कमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत 3705.4 मि.मी. पाऊस झाला होता. पावसाच्या तुटीचे हे प्रमाण 32.4 टक्के एवढे आहे. यावर्षी जरी पाऊस कमी झाला तरी तो समाधानकारक व शेतीला पूरक पडला आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी न झाल्यास भातशेती आणि गवताचे नुकसान होण्याची भीती आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत 30 सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी 2751.1 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत सरासरी 3705.4 मि. मी.पाऊस पडला होता. जिल्ह्यात यावर्षी 12 मे पासून पावसाला सुरुवात झाली. तर मान्सूनचे आगमन पंधरा दिवस अगोदर म्हणजे 21 मे रोजी झाले. यामुळे शेतकर्यांना पूर्व मशागतीची कामे करता आली नाहीत. गेल्या काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. रात्रीच्या कालावधीत पडणार्या मुसळधार पावसामुळे काहीसे हवेत वातावरण गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, ऊन आणि पाऊस या खेळामुळे तापसरी व अन्य साथीच्या आजारांचा प्रादुभार्व वाढला आहे. दूषित पाण्यामुळे अतिसार व अन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे.
यावर्षी मे महिन्यामध्ये 541.3 मि. मी. पाऊस झाला. तर जून महिन्यामध्ये 666.7 मि.मी. पाऊस पडला. जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. गणेशोत्सव आणि आता नवरात्रौत्सवातही पाऊस झाल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले. दरम्यान, सतत पडणारा पाऊस भातशेतीसाठी पूरक असला तरी भुईमूग, उडीद, उडीद, नाचणी आदी नगदी पिकांवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. संततधार पावसामुळे ही नगदी पिके कुजून जाण्याचा धोका आहे.
मान्सूनच्या कोसळधारांमुळे दाणादाण उडालेल्या महाराष्ट्रात ‘जा रे जा रे पावसा’ अशी आळवणी सुरू झाली आहे. नागरिकांना परतीच्या पावसाचे वेध लागले असतानाच, भारतीय हवामान विभागाने मात्र डिसेंबरपर्यंत पाऊस मुक्कामालाच असेल, असे म्हटले आहे. हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, येणारे तीन महिने (ऑक्टोबर ते डिसेंबर) देखील महाराष्ट्रासाठी पावसाचेच असणार आहेत. या कालावधीत राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच अर्थ, मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याची आणि हिवाळ्यातही पावसाची शक्यता कायम राहण्याची चिन्हे आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस वैभववाडी तालुक्यात 3452.7 मि. मी. तर त्या खालोखाल कणकवली तालुक्यात 3382.7 मि. मी. पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस दोडामार्ग तालुक्यात 2154.3 मि. मी. पडला आहे. देवगड तालुक्यात 2514.6, मि. मी., मालवण-2600.2 मि. मी., सावंतवाडी - 2841 मि. मी., वेंगुर्ले - 2465.4 मि. मी., कुडाळ-2653.3 मि. मी., दोडामार्ग - 2154.3 मी. मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाचे प्रमाण कायम असून हवामान खात्याकडून सातत्याने रेड अलर्ट दिले जात आहेत. पावसाचा प्रमाणात घट न झाल्यास गेल्यावर्षी सारखी भात शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकर्यांना आहेे.