कणकवली : गेल्या महिनाभरापासून ज्या उत्सवाची कोकणवासीयांना उत्कंठा होती, तो कोकणचा महाउत्सव अर्थात गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील घराघरांत बाप्पांच्या स्वागताच्या तयारीची लगबग सुरू आहे. या उत्सवासाठी प्रत्येक घरोघरी चाकरमानी मंडळी येण्यास सुरुवात झाली असून, एरव्ही बंद असणारी घरे उघडली आहेत. प्रत्येक घरादारांना चैतन्यरूपी झळाळी प्राप्त झाली आहे. चाकरमान्यांच्या आगमनामुळे रेल्वे आणि बसस्थानके गजबजून गेली असून, लहान-मोठ्या सर्वच बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. या उत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे, तर मूर्तिशाळांमध्येही मूर्तिकारांची मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यासाठी धावपळ सुरू असून, ज्या दूरवरच्या मूर्ती आहेत, त्या घरोघरी नेण्यास गणेशभक्तांनी गुरुवारपासूनच सुरुवात केली.
कोकणात सर्वच सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरे केले जात असले तरी कोकणच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य काही वेगळेच आहे म्हणूनच कोकणच्या गणेशोत्सवाची भुरळ सर्वांनाच असते. जसे कोकण आणि मुंबई यांचे अतुट नाते आहे, तसेच मुंबईकर चाकरमानी आणि कोकणचा गणेशोत्सव हेदेखील वेगळेच समीकरण आहे. चतुर्थीला मुंबईतील चाकरमानी आपल्या गावी आला नाही असे कधीही होत नाही. प्रत्येक घराघरात चाकरमानी मंडळी आपल्या कुटुंब कबिल्यासह दाखल होतात. आषाढ सरला आणि श्रावणमास सुरु झाला की कोकणी माणसाला आणि चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. अर्थात कोकण रेल्वेने येणारे चाकरमानी चार महिने अगोदरच रेल्वे तिकिटांचे बुकिंग करतात. ऑनलाईन बुकिंगमुळे एसटी गाड्यांचेही बुकिंग दोन महिने अगोदरच होते. अर्थात असे असले तरी मुंबईकर चाकरमानी गावी अधूनमधून फोन करून गणेशोत्सवाचा हालहवाल घेतात तर गावचा कोकणी माणूसही चाकरमान्यांना फोन करून गावी कोण कोण येणार याचा कानोसा घेतो. श्रावणातील नागपंचमी, नारळीपौर्णिमा आणि अष्टमी झाली की गणेशोत्सव अगदी नजिक येऊन ठेपतो. आतातर अवघ्या एका दिवसावर बाप्पांचा हा महाउत्सव आला आहे.
कोकणातील प्रत्येक घराघरात बाप्पांच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. पुर्वी मातीच्या घरांच्या भिंती लाल मातीच्या गिलाव्याने रंगवल्या जात असत. काळानूसार त्यात बदल झाला, गिलाव्याची जागा डिस्टंबर कलरने घेतली, त्यानंतर मातीच्या भिंती जावून चिरेबंदी घरे झाली. प्लास्टर केलेल्या भिंतींना आता ऑईलपेंट किंवा तत्सम कलर रंगवण्यासाठी वापरले जावू लागले आहेत. आता वॉशेबल कलरही उपलब्ध आहेत. घरादारांची साफसफाई झाली असून आकर्षक अशा विद्युत रोषणाईने घरेदारे झळाळून गेली आहेत. दारांवर विविध प्रकारची तोरणे आणि अन्य सजावट करण्यात आली आहे. तर बाप्पांची ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते त्या देवघरात किंवा खोलीत लाकडी मंडपी बांधून त्याला निसर्ग फुलांची आरास केली जाते. सध्या हे काम सुरु आहे. जरी कृत्रिम फुले, विद्युत तोरणांची सजावट असली तरी रानफुलांच्या आरासीला एक वेगळे महत्व आहे. तसेच ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान होतात त्या भिंतीवर मागे चित्रे काढली जातात.
पुर्वी हाताने हि चित्रे काढली जात असत. आता काळानूसार विविध देवता, निसर्गचित्रांचे बॅनर उपलब्ध होत असल्याने ते बॅनर मागे लावले जातात. अर्थात अनेक ठिकाणी अद्यापही पूर्वीप्रमाणेच भिंतीवर चित्र रंगवणे, बाप्पा विराजमान होतात त्या समोर हॉलमध्ये रंगीबेरंगी पताका लावणे या गोष्टी जपल्या जातात. आता पताकांची जागा छतांनी घेतली आहे. विविध प्रकारचे छत लावून त्यावर रोषणाई केली जाते. सध्या घरोघरी हे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पूर्वी मुंबईकर चाकरमानी मुंबईहून आरास सजावटीचे साहित्य घेवून येत असत आता इथल्या स्थानिक बाजारपेठांमध्येही हे साहित्य उपलब्ध होवू लागले आहे. मधल्या काळात चायना तोरणे व अन्य सजावटीचे साहित्य लावण्याकडे कल होता मात्र अलिकडच्या काही वर्षात चायनापेक्षा देशी सजावट साहित्यावर गणेशभक्तांचा कल वाढला आहे. बाप्पांचा उत्सव म्हणजे गोडधोड पदार्थांची रेलचेल. दीड, पाच, सात, अकरा, एकवीस दिवस याप्रमाणे घरोघरी विराजमान होणार्या बाप्पांच्या नेवेद्यासाठी विविध पदार्थ केले जातात. त्याची पूर्वतयारी गृहिणींकडून सुरु आहे.
बाप्पांचा उत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने बाजारपेठा चाकरमानी गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. विविध प्रकारची फळे, भाजीपाला, फुले, आरासीचे साहित्य, रानफुले, हरतालिकासाठी लागणारे शहाळी, केळी, किराणा साहित्य अशा विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी सुरु आहे. गणेशोत्सव काळात कोकणातील बाजारपेठांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. विविध वस्तूंबरोबरच कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. कोकणातील अनेक घरातील मंडळी मुंबईला असल्याने इतरवेळी घरे बंद असतात मात्र गणेशोत्सव काळात हि बंद घरे उघडतात. घरांच्या स्वच्छतेबरोबर परिसराची साफसफाई केली जाते. विद्युत रोषणाईने घर आणि अंगण झळाळून निघते. मुंबईहून आलेले चाकरमानी स्थानिकांबरोबरच या कामात गुंतले आहेत.
कोकणातील आणखी एक वैशिष्टय म्हणजे घरगुती गणपतींची संख्या मोठी असल्याने मुर्तीशाळा कोकणात मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास दोन अडीज महिने अगोदरपासून मुर्तीकार मुर्ती बनविण्यास सुरुवात करतात. आतापर्यंत जवळपास हे काम पूर्णत्वास आले आहे. मुर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच मुर्तीकारांची स्थिती असते. रात्रंदिवस मुर्तीकारांना मेहनत घ्यावी लागते. दोन दिवस आधीपासून गणेश मुर्ती आपल्या घरी नेतात. त्यामुळे या मुर्ती वेळेत बनवून पूर्ण करण्याचे आव्हान मुर्तीकारांसमोर असते.
दरम्यान या उत्सवाचा आनंद अधिकाधिक द्विगुणित व्हावा यासाठी जिल्हा आणि पोलिस प्रशासनही सतर्क आहे. बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी होवू नये यासाठी आवश्यक ते नियोजन स्थानिक यंत्रणांनी केले आहे. पोलिसांबरोबर होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दलाचे कर्मचारीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी हरतालिका असून शनिवारपासून बाप्पांचा उत्सव भक्तीमय वातावरणात सुरु होणार आहे. त्यानंतर पुढील अकरा, एकवीस दिवस जिल्हा भक्तीमय रसात न्हावून निघणार आहे.