मसुरे : मसुरे -मेढावाडी येथील प्रभाकर सदाशिव माने यांच्या घराला सोमवारी दुपारी 4 वा. च्या सुमारास आग लागून पूर्ण घर आगीत भस्मसात झाले. यावेळी घरात असलेले प्रभाकर माने ( 78) हे सुमारे 80 टक्के भाजल्याने त्यांचे निधन झाले असून त्यांची पत्नी शुभदा माने (70 वर्ष ) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालय येथे उपचार चालू आहेत. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
मुंबई येथून आलेले प्रभाकर माने हे दुपारी जेवण झाल्यानंतर एका खोलीत आराम करत होते. दरम्यान शेजारील घरातील आपा सावंत यांना श्री. माने यांच्या घराच्या छप्परातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यांनी बाहेर येऊन पहिले असता घराच्या छप्पराला आग लागल्याचे दिसून आले. लागलीच शेजारील महिला व ग्रामस्थांनी घरात धाव घेत त्यांना बाहेर येण्यास सांगितले. दरम्यान आगीने जोरात पेट घेतल्याने खोलीत असलेले प्रभाकर माने बाहेर पडू शकले नाही.तर शुभदा माने या घराबाहेर पडत असताना अंगणात पडल्याने जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना प्रा. आ. केंद्र मसुरे येथे उपचार करून सिटी स्कॅनसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
काही धाडसी ग्रामस्थांनी पेटत्या घरात प्रवेश केला असता प्रभाकर माने हे एका खोलीत भाजलेल्या अवस्थेत दिसून आले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर आणत अधिक उपचारासाठी नेले. परंतु प्रा. आ. केंद्र मसुरे येथे त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लोमटे यांनी सांगितले. दरम्यान मालवण नगरपंचायतीचा अग्निशमक बंब सायं. 5वा. च्या सुमारास दाखल झाला. घराच्या छपराला आग लागल्याने बाजूच्या दोन घराना धोका निर्माण झाला होता. अग्निशमक बंब आल्यानंतर आगीवार नियंत्रण मिळविण्यात यश आले
मसुरे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, पोलीस विवेक फरांदे, उपसरपंच राजेश गावकर, शिवाजी परब, संग्राम प्रभूगावकर, छोटू ठाकूर, सौ. लक्ष्मी पेडणेकर, डॉ. विश्वास साठे, जगदीश चव्हाण, बाबू आंगणे, कोतवाल सचिन चव्हाण, विनोद मोरे, सुदर्शन मसूरकर यांनी पाहणी करत मदत कार्यात सहभाग घेतला. महावितरणचे कर्मचारी अमित बागवे, श्री. परब यांनी वीज पुरवठा खंडित केला.