सिंधुदुर्ग : अखेर चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न सुटला

65 गाव प्रमुखांची समिती गठित; ग्रामस्थांकडून जल्लोष
Sindhudurg news
सिंधुदुर्ग
Published on
Updated on

सावंतवाडी ः चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्नावरून जमीन वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शासनाकडून 65 गाव प्रमुखांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या समितीच्या माध्यमातून कुटुंब निश्चिती करून जमीन वाटप प्रक्रिया राबविण्यात यावी,असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत जाहीर केले. दरम्यान, गेली अनेक वर्षे रखडलेला प्रश्न सुटल्यामुळे उपस्थित चौकुळ ग्रामस्थांनी जल्लोष केला. प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार्‍या मंत्री केसरकर व महायुती शासनाचे आभार व्यक्त केले.

दरम्यान, पुढच्या शंभर वर्षांत होणारा विकास लक्षात घेता या गावात रस्ते, पर्यटनस्थळ तसेच विविध प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून गावाचा विकास करावा. गाव जो काही निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा असेल असे केसरकर यांनी यावेळी जाहीर केले. महायुती शासनाच्या माध्यमातून चौकुळ गावाला गेली अनेक वर्षे भेडसावणारा प्रश्न सोडवण्यासंदर्भात शासन अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशाबाबत माहिती देण्यासाठी केसरकर यांनी शुक्रवारी सावंतवाडीत वैश्यभवन येथे चौकुळ ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी झालेला शासन निर्णय स्वतः वाचून दाखवला. यात गावाच्या मागणीप्रमाणे गावकर ही पद्धत कायम ठेवून एकत्र सातबारा पद्धती कायम ठेवून जमीन वाटपास परवानगी देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर तब्बल 65 प्रमुख लोकांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली. त्या माध्यमातून 2343 हेक्टर खाजगी वन असलेली जमीन आणि 4797 हेक्टर कबुलायतदार गावकर म्हणून असलेली जमीन सम प्रमाणात वाटप करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असल्याचे जाहीर केले. तसेच त्या शासन अध्यादेशाचे पत्र गावातील प्रमुख मानकर्‍यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी केसरकर यांनी सकारात्मक भूमिका जाहीर घेतल्याचे समजताच उपस्थित गावकर्‍यांनी जल्लोष केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत दीपक केसरकर यांचे आभार मानले. तसेच त्यांच्यामुळे हा प्रश्न सुटला त्यामुळे त्यांना पुढच्या राजकीय वाटचालीत यश प्राप्त होवो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सीईओ देशमुख, भरत गावडे, दिनेश गावडे, 65 समिती सदस्यांपैकी सोनू गावडे, विठ्ठल गावडे, भिकाजी गावडे, बापू गावडे, वासुदेव गावडे, तुकाराम गावडे आदींसह ग्रामस्थ महिला मुलांसह उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाचे अवर सचिव विनायक लवटे यांनी 20 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये चौकुळ येथील महाराष्ट्र शासन (निव्वळ काबुलायदार) व कबुलायतदार गावकर जमिनीस खाजगी वन असा असलेला शेरा कमी करून ती लाभधारक शेतकर्‍यांना वितरित करणे व वितरित करण्यासाठी समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या आदेशांमध्ये म्हटले आहे की, आंबोली- चौकुळ -गेळे कबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप करण्याच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्णयानुसार शासनाने 26 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार आंबोली व गेळे येथील काबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप नियमानुसार करण्यात येत आहे. उर्वरित मौजे चौकु ळ येथील कबुलायतदार गावकर जमिनीबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी आंबोली व गेळे या गावाबाबत अवलंबिलेल्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करावा व तदनंतर तेथील ग्रामस्थांनी सम प्रमाणात जमीन वाटपाबाबत समिती दर्शवल्यास चौकुळ येथील ग्रामस्थांना विहित कार्यपद्धतीनुसार जमीन वाटप करण्यात यावी असे म्हटले आहे. चौकु ळ, नेने, मसुरे, केगद या गावांचे कबुलायतदार जमिनींपैकी एकूण 2342 हेक्टर आर. इतक्या क्षेत्रावरील खाजगी वनक्षेत्र असलेला शेरा कमी करून तसेच कबुलायतदार क्षेत्र 4697. 68 हेक्टर आर.क्षेत्र जमीन वाटपासाठी उपलब्ध होणार आहे, असेही अहवालात नमूद आहे.

सदर क्षेत्राचे वाटप करण्याच्या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत चौकुळ यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार 19 ऑगस्ट 2024 रोजी ठराव करून 65 व्यक्तींची ग्रुप ग्रामपंचायत चौकु ळ, नेने मसुरे, केगद यांची समिती असावी. तसेच आपण प्रस्तावित केल्याप्रमाणे तसेच ग्रुप ग्रामपंचायत चौकुळ यांच्या ठरावाच्या अनुषंगाने कबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत चौकुळमधील 65 व्यक्तींचा समावेश असलेली गाव समिती गठित करण्यास शासन मान्यता देत असल्याच म्हटले आहे. दरम्यान या समितीला मूळ गाव कबुलायतदार इतर गावकर्‍यांचे हक्क अबाधित ठेवणे गावामध्ये स्थानिक सर्व कबुलायतदार इतर गावकरांना कुटुंब यादीप्रमाणे अणेवारीनुसार जमीन वाटपाचे अधिकार कबुलायतदार गावकर समितीकडेच राहील.

समितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव, एक कबुलायतदार गावकर समितीतील सदस्य असेल व ते निवडण्याचा अधिकार गावकर समितीलाच असेल. कुटुंबियांनी सर्वस्वी अधिकार कमलाकर गावकर समितीलाच राहील. कबूलायतदार गावकर जमिनी संदर्भात सर्वाधिकार (पावर ऑफ एटर्नी) कबुलायतदार गावकर सोनू धोंडू गावडे ,विठ्ठल गणपत गावडे आणि भिकाजी आप्पा गावडे यांना राहतील अशा प्रकारचे आदेश अवर सचिव विनायक लवटे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सहाय्यक संचालक नगररचनाकार यांना दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news