Sindhudurg
तिलारी घाटातील रस्त्याला भगदाडPudhari Photo

Sindhudurg | तिलारी घाटातील रस्त्याला भगदाड

Published on

दोडामार्ग : तिलारी तिलारी घाटात अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग खचण्याची घटना ताजी असताना रस्त्याला मोठे भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. अरुंद असलेल्या घाटाच्या वळणावरच भगदाड पडल्याने त्याचा अंदाज वाहनचालकांना येऊ शकत नाही. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे भगदाड तातडीने बुजवण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन ाज्यांना जोडण्याचे काम तिलारी घाट करतो. तिलारी घाटातील रस्त्यांची पाच वर्षांपूर्वी दुरुस्ती झाली होती. त्यानंतर झालेल्या पहिल्याच अतिवृष्टीमुळे या घाटातील तीन ठिकाणी रस्ता खचला होता व घाट वाहतुकीस पूर्णतः बंद झाला होता. पावसाळा संपताच चंदगड सार्वजनिक बांधकाम उपविभागाने खचलेल्या घाट रस्त्याची दुरुस्ती केली होती. त्यानंतर सुदैवाने या घटनांची पुनरावृत्ती झाली नव्हती.

अलिकडच्या दोन वर्षांत दक्षिण भारतातील पर्यटक गोव्याला जाण्यासाठी या घाटमार्गाचा वापर करू लागले. तसेच इतर पर्यटकांनीदेखील गुगल मॅपचा सहारा घेत गोव्याला जाण्याचा प्रयत्न केल्यास जवळचा मार्ग म्हणून याच घाटमार्गाचा रस्ता दाखविला जातो. परिणामी घाटातील वाहतूक वाढली. दैनंदिन कामकाजानिमित्त वाहतूक करणाऱ्यांसह पर्यटकांना सोयीस्कर असलेल्या या घाटातील जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर यंदा ७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग संरक्षक कठड्यासह ढासळला होता.

चंदगड बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी दगडी व काठ्यांच्या सहाय्याने बांध घालून तात्पुरती उपाययोजना केली. दरम्यान, या धोकादायक उतारावर वाहने हाकणे जोखमीचे बनले आहे. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा तिलारी घाटातील एका ठिकाणी डोंगराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. यावेळी मातीसह मोठाले दगड रस्त्यावर आले. या घटना ताज्या असताना घाटातील एका ठिकाणी रस्त्याला मोठे मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. अरुंद रस्त्याला भगदाड पडल्यामुळे वाहन चालविणे जोखमीचे बनले आहे. खोल दरी असलेल्या या घाटात भगदाडामुळे अपघात झाल्यास चालकासह प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे घाटातील वाहनांची वर्दळ लक्षात घेता हे भगदाड तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.

एसटी वाहतूक बंदी सुरू राहण्याची भीती

तिलारी घाट एसटीसह अवजड वाहनांसाठी २० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. आता पडलेल्या भगदाडावर तात्पुरती उपाययोजना करणे शक्य आहे. मात्र घाटातील जयकर पॉईंट येथील तीव्र उतारावर खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती ही पावसाळ्यानंतरच करणे शक्य असल्याने ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद असलेली एसटी वाहतूक ही पुढे आणखी काही महिने बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी सुरू होण्याची वाट पुढील आणखी काही महिने पहावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news