शिवपुतळा भ्रष्टाचार आरोप प्रकरण : पुराव्यांसाठी आ. वैभव नाईक यांना नोटीस

पोलिस उपअधीक्षकांनी नोटीस पाठवत केली पुरावे सादर करण्याची मागणी
MLA Vaibhav Naik
आ. वैभव नाईक
Published on
Updated on

कणकवली : मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आ. वैभव नाईक यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व अधिकार्‍यांवर केला होता. या पार्श्वभूमीवर कणकवलीचे पोलिस उपअधीक्षक घनश्याम आढाव यांनी आ. नाईक यांना नोटीस देऊन त्यांनी केलेल्या आरोपांबाबत उपलब्ध पुरावे चार दिवसांत सादर करून तपासकामी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत आ. नाईक यांनी तातडीने पोलिसांना सहकार्य करत नोटिसीला उत्तर दिले आहे.

आ. वैभव नाईक यांना पोलिस उपअधीक्षकांनी दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे, राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्या गुन्हयाचा तपास आम्ही करत आहोत. आपण पत्रकार परिषद घेवून उपरोक्त नमुद घटनेच्या अनुषंगाने पुतळा बांधकाम कामी भ्रष्टाचार झालेबाबत प्रसारमाध्यमांना कथन केले आहे. त्याबाबत प्रसारमाध्यमांकडून आम्हाला विचारणा होत आहे, तरी आपण कथन केल्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपास कामी आपल्याकडील उपलब्ध पुरावे चार दिवसात कणकवली पोलिस उपअधीक्षक कार्यालयात सादर करून सहकार्य करावेे.

आ. वैभव नाईक यांनी पोलिस उपअधीक्षकांना दिलेल्या नोटीसीच्या उत्तरात म्हटले आहे, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आपण माझ्याकडे माहिती मागविली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे काम नौदलाने केले असल्याचे सार्व. बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकार्‍यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले आहे. मात्र पुतळा सुशोभिकरण आणि नौदल दिन खर्च अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी 2.5 कोटी रु. आणि जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग यांनी 5.5 कोटी रु. खर्च केला असल्याची लेखी माहिती मला सबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे. सार्व. बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे नौदलाचे हे काम असेल तर सार्व. बांधकाम विभाग कणकवली आणि जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग यांनी केलेला खर्च कुठे गेला? असा प्रश्न आहे. नौदल दिनानिमित्त नौसेनेने केलेल्या खर्चाचा तपशील देण्याबाबत नौसेना अधिकार्‍यांशी मी पत्रव्यवहार केला आहे. नौसेनेने अद्याप याबाबत माहिती दिलेली नसून नौसेनेकडून सदर माहिती मिळताच त्याबाबतची माहिती आपल्याला देण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news