घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा त्रास होणार नाही

आ.नीलेश राणे यांची एमआयडीसीतील नागरिकांना ग्वाही
Sindhudurg News
आ.नीलेश राणे
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पा विरोधात स्थानिक उद्योजक व रहिवाशांनी बुधवारी पुन्हा रस्त्यावर उतरत विरोध दर्शविला. या प्रकल्पाच्या संरक्षक भिंत बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाला आलेल्या आ. नीलेश राणे यांच्या समोर स्थानिक रहिवाशांनी भूमिका मांडली. यावेळी आ. राणे यांनी स्थानिक रहिवाशांना या प्रकल्पाबाबतची माहिती देत त्यांची समजूत काढली. 21 व्या शतकातील हा मॉडेल प्रकल्प असून, या प्रकल्पामुळे कोणालाही कसलाही त्रास होणार नाही, याची गॅरंटी मी देतो. प्रकल्पाचे सविस्तर प्रेझेंटेशन तुमच्यासमोर दाखवले जाईल, तुमचे नुकसान आपण होऊ देणार नाही, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती आ. राणे यांनी नागरिकांना केली. त्यानंतर नागरिकांनी शांत होत, सहकार्याची भूमिका घेतली. नंतर आ.राणे यांच्या हस्ते संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

कुडाळ -एमआयडीसी येथे न.पं.च्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या संरक्षक भिंत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक उद्योजक आणि रहिवाशी नागरीकांनी या प्लॉट समोरील रस्त्यावर एकवटत या प्रकल्पाला विरोध दर्शवला. याबाबतची माहिती मिळताच कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी जात नागरिकांशी चर्चा करीत सहकार्य करण्याची विनंती केली. काही नगरसेवकांनीही नागरिकांशी चर्चा करीत, या प्रकल्पामुळे कोणताही त्रास होणार नाही, असे सांगत सहकार्य करण्याची विनंती केली. परंतू नागरिक आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. त्यानंतर रहिवाशी नागरीकांच्या शिष्टमंडळाने अ. नीलेश राणे यांची एमआयडीसी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन भूमिका मांडली. आ.राणे यांनी या प्रकल्पामुळे कोणताही त्रास परिसरातील नागरिक तसेच उद्योगांना होणार नाही, याची आपण आमदार म्हणून गॅरेंटी देतो, असे सांगून सहकार्य करण्याची विनंती करीत या प्रकल्पाबाबत गॅरंटी दिली.

काही वेळातच आ.राणे या संरक्षक भिंत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी त्या प्लॉटकडे दाखल झाले. मात्र भूमिपूजनापूर्वी तेथे जमलेल्या स्थानिक रहिवाशी, नागरिक व उद्योजकांशी आ.राणे यांनी भेट घेतली. तेव्हा काही उपस्थितांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण या परिसरात अनेक उद्योग, महाविद्यालय, हॉस्पीटल व लोकवस्ती असून या प्रकल्पामुळे त्रास होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली. या प्रकल्पासाठी हिच जागा का निवडली?, अन्यत्र खूप जागा आहेत, तेथे प्रकल्प का नेला नाही? असे प्रश्न नागरिकांनी केले. त्यावर आ.राणे यांनी या प्रकल्पासाठी या जागेचे नोटीफीकेशन आपण आमदार व्हायच्या आधी झालेले नाही. आपण फक्त निधी मंजूर करून आणला आहे. शिवाय हा 21 व्या शतकातील हा मॉडेल प्रकल्प असून, एक टक्काही दुर्गंधी बाहेर येणार नाही, किंवा कोणालाही कसलाही त्रास होणार नाही, याची 100 टक्के गॅरेंटी आपण तुम्हाला देतो. जर ुर्गंधी बाहेर आली किंवा नागरिकांना त्रास झाला तर त्याला मी स्वतः जबाबदार आहे. जर मी खोट सांगत असेन तर तुम्ही कधीही मला परत हक्काने विचारा. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुमच्या सोबतच मी आहे. तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. तुम्हाला धोक्यात टाकणार नाही, एवढ 100 टक्के सांगतो. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती आ. राणे यांनी नागरिकांना केली.

त्यानंतर आ.राणे यांच्या हस्ते प्रकल्पाच्या संरक्षक भिंत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. शिवसेना उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.दीपलक्ष्मी पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, अभी गावडे, अ‍ॅड. राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, श्रृती वर्दम, ज्योती जळवी, मंगेश चव्हाण, चेतन पडते, आबा धडाम, नगरअभियंता सोनाली हळदणकर, प्रशासकीय अधिकारी राजू पठाण व सागर पाटील आदींसह न.पं. अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news