

सावंतवाडी : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जागांचा योग्य सन्मान न झाल्यास येणाऱ्या निवडणुका ‘गनिमीकाव्याने’ लढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणजे लाख कार्यकर्त्यांसारखा आहे. आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीने आमचा सन्मान ठेवणे गरजेचे आहे.
उमाकांत वारंग यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा त्याच ताकदीने लढवणार आहे. त्यांनी महायुतीकडे 25 टक्के जागांची मागणी केली आहे. युतीने सन्मान केल्यास आम्ही 25 टक्के जागांवर लढू, अन्यथा सर्व जागा स्वबळावर लढू, असा थेट इशारा त्यांनी दिला.
तालुकाध्यक्ष उदय भोसले म्हणाले, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने आमची बैठक झाली. महायुतीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचार केला आहे. नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे दोन सक्षम उमेदवार तयार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत, त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढावी लागली तरी आम्ही मागे हटणार नाही, असे श्री.भोसले यांनी नमूद केले. सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी दोन महिला उमेदवार आमच्याकडे आहेत. जर विचारविनिमय झाला,सहकार्य मिळेल तर ठिक, अन्यथा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
सुरेश गवस, शफीक खान, हर्षवर्धन धारणकर, अगस्तीन फर्नांडिस, एम.डी. सावंत, अस्लम खतिब, संदीप पेडणेकर, साबाजी सावंत, रिद्धी परब, धारीणी देसाई, मेघेंद्र देसाई, विलास पावसकर, विजय कदम, रोहन परब, शिवाजी जंगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.