

सावंतवाडी : माजी खा. छत्रपती संभाजी राजे यांनी स्थापन केलेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सावंतवाडी विधानसभा निवडणूका लढणार आहे. या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी छ. संभाजी राजे लवकरच सिंधुदुर्गात येणार असून कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्रातील किचकट व गलिच्छ झालेल्या राजकारणाला शुध्द करण्याचा नारा देत माजी खा. छत्रपती संभाजीराजे यांनी अलिकडेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाद्वारे ते महाराष्ट्र विधानसभेच्या काही जागा लढवणार आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार ते विधानसभा निवडणूकांना उमेदवार देणार आहेत.
सिंधुदुर्गातील तीन विधानसभा निवडणूकांपैकी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने लढवावी, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे केली आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांची बैठक घेऊन इच्छुक उमेदवारांची नावे लवकरच पक्षाकडे पाठविण्यात येणार आहेत. वेळ पडल्यास सिंधुदुर्गातील तीनही विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी आहे.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच जिल्हयात पार पडली. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीस संतोष तळवणेकर, कल्याण कदम, पूजा गावडे, संचिता गावडे, सेजल पेडणेकर, मंगेश माणगांवकर, साक्षी तळवणेकर, उमेश तळवणेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.