

कुडाळ : कुडाळ शहरातील सर्व्हिस रोड अरूंद असून यामुळे अवजड वाहनांसह अन्य वाहनधारकांना अनेकदा समस्या निर्माण होत आहेत. सद्यस्थितीत एस. एन. देसाई चौक येथे दुरूस्ती कामादरम्यान महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून सुरू असलेली वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत आहे. यामुळे शहरातील अरूंद सर्व्हिस रोडचा विषय चर्चेचा ठरला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सर्व्हिस रोडचे रूंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौक येथील रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. रस्ता दुरुस्ती दरम्यान येथील सर्कल काढण्यात आले आहे. उद्यमनगर ते या चौकापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आला आहे. यानंतर आता राज हॉटेल ते एमआयडीसी नाका रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यामुळे उद्यमनगरातून येणारी वाहतूक महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून वळविण्यात आली आहे. मुळात शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणचे सर्व्हिस रोड अरुंद आहेत. महामार्गावरील राज हॉटेल ते उद्यमनगर येथील सर्व्हिस रोडही अरुंद आहे. अशा अरूंद मार्गावरून येणारी व जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वस्तुतः हा एकेरी मार्ग असताना दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने मार्गावर अनेक छोटे अपघात होत आहेत. याच बरोबर उद्यमनगर-एमआयडीसी रस्त्याची दुरुस्ती सुरू असल्याने वाहन चालक याच सर्व्हिस मार्गाचा उपयोग करत आहेत. मात्र हा सर्व्हिस मार्ग एकेरी व अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
या ठिकाणी एक लो व्हेईकल अंडरपास आहे. येथून केवळ छोटीच वाहने जाऊ शकतात. अवजड वाहने येथून जाऊ शकत नसल्याने अवजड वाहनांना महामार्गावर जाण्यासाठी सर्व्हिस रोडचाच वापर करावा लागतो. मुळात सर्व्हिस रोड अरुंद असल्याने अवजड वाहनांच्या चालकांना महामार्गावर जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुडाळ शहरात अशी स्थिती काही ठिकाणी निर्माण होत आहे. याचा अभ्यास करून शहरातील महामार्गावर असलेल्या सर्व्हिस रोडची काही ठिकाणी रुंदी वाढवावी अशी मागणी वाहनधारकांमधून करण्यात येत आहे.
शहरातील उद्यमनगर व राज हॉटेल या ठिकाणी मोठे ब्रीज आवश्यक आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून एका ठिकाणी मिडल कट तर दुसर्या ठिकाणी लो व्हेईकल अंडरपास तयार केला आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा भार या सर्व्हिस रोडवर येत आहे. सर्व्हिस रोडवरील वाहनांचा वाढता भार आता अपघातांना निमंत्रण देणारा आहे.
महामार्ग प्राधिकरण आता नव्याने करण्यात येणार्या बॉक्सवेलच्या ठिकाणी सर्व्हिस रोड रूंद करत आहे. साळगावसह महामार्गावरील अन्य काही बॉक्सवेलच्या ठिकाणी असलेले सर्व्हिस रोड रूंद करण्यात येत आहेत. मग कुडाळ शहरातील सर्व्हिस रोडवरील वाहतुकीचा प्रचंड भार असतानाही या सर्व्हिस रोडच्या रूंदीकरणाकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न वाहनचालकांचा आहे.