

सावंतवाडी : गुरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी सातुळी तिठा येथे कारवाई करत अवैध व निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघावर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरलेला बोलेरो टेम्पो व त्यातील गाय व वासरू अशी दोन जनावरे ताब्यात घेण्यात आली. या जनावरांना गोशाळेत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी विलास धोंडिराम चव्हाण (वय 57), दिग्विजय सूर्यकांत पाटील (43), नामदेव आनंदा चव्हाण (35, सर्व रा. चिमणे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या वाहतुकीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सातुळी येथे सापळा रचला होता. यादरम्यान तेथे आलेला बोलेरो टेम्पो थांबवून तपासणी केली असता टेम्पोमध्ये गाय व वासरू अशी दोन जनावरे दिसून आली.
चालकाकडे जनावरे वाहतुकीचा परवाना नसल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी या दोन जनावरांसह टेम्पो जप्त करत या जनावरांची विनापरवाना वाहतूक केल्याच्या गुन्ह्याखाली वरील तिघांना अटक केली. ही जनावरे त्यांनी मालवण तालुक्यातील कातवण-कुंभारमाठ येथून खरेदी केली होती. ती आजरा येथे नेण्यात येत होती; मात्र जनावरांच्या वाहतुकीमागचा हेतू समजलेला नाही.
आंबोली दूरक्षेत्राचे अंमलदार संतोष गलोले, मनीष शिंदे आणि सातुळी ट्राफिक पॉईंटचे अंमलदार गोसावी यांनी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या दोन्ही गुरांना सुरक्षितपणे गोशाळेत ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वरील तिन्ही संशयितांवर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि पाळीव जनावरांची विनापरवाना वाहतूक केल्याबद्दल सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.