

कणकवली : कनेडी-फोंडाघाट मार्गावर सांगवे- तेलंगवाडी दरम्यान शनिवारी रात्री 9.30 वा. च्या सुमारास फोंड्याच्या दिशेने जाणार्या बोलेरो पिकअप टेम्पोला ग्रामस्थांनी संशयावरून अडविले. त्यातून मुर्हा जातीच्या एका रेड्याची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. टेम्पो चालक महेंद्र शिवाजी डाफळे (26, रा. डाफळे वसाहत, सावर्डे खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) याच्याकडे गुरे वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी रात्री सांगवे येथे जावून टेम्पोसह रेड्याला पंचनामा करून ताब्यात घेतले.
सांगवे-तेलंगवाडी येथील राजेंद्र गावकर हे शनिवारी रात्री गावातील दिर्बादेवी मंदिरातील कार्यक्रम संपल्यानंतर वाडीतील ग्रामस्थांसमवेत घरी निघाले होते. रात्री 9.15 वा. च्या सुमारास कनेडी-फोंडाघाट मार्गावर तेलंगवाडी येथे एक बोलेरो पिकअप टेम्पो जात असल्याचे दिसून आले. त्यांनी व ग्रामस्थांनी टेम्पोला थांबवून आत पाहिले असता मुर्हा जातीच्या रेड्याची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले. हा टेम्पो महेंद्र डाफळे चालवत होता तर सोबत त्याचा चुलत भाऊ सर्वजित युवराज डाफळे (19) हा होता. राजेंद्र गावकर यांच्यासमवेत राजेश सापळे, हरेश मोरये, रमा गुरव, महेश कांबळे, मुकेश सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
टेम्पो चालकाने आपण हा रेडा कुपवडे येथील एका शेतकर्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. मात्र त्याच्याकडे जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे राजेंद्र गावकर यांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कनेडी पोलिस दूरक्षेत्रचे हेड कॉन्स्टेबल सुनील वेंगुर्लेकर हे घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो चालकाकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने व त्याच्याकडे परवाना नसल्याने टेम्पो ताब्यात घेत त्याला कणकवली पोलिस स्टेशनवर आणण्यात आले.
कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे यांच्या उपस्थितीत पंचनामा करत गुन्हा दाखल करण्यात आला. कनेडी बाजारपेठ येथे फोंड्याच्या दिशेने जाणार्या टेम्पोतून एक दिवस अगोदर शुक्रवारी रात्री तीन गुरे ताब्यात घेण्यात आली होती. ग्रामस्थांनी टेम्पोला अडवून ही गुरांची अवैध वाहतूक रोखली होती. त्यानंतर दुसर्यादिवशी पुन्हा त्याच मार्गावरून जाणार्या या टेम्पोतून रेड्याची होणारी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली आहे.
रेड्याला गोशाळांमध्ये प्रवेश मिळेना
शनिवारी रात्री रेड्यासह टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर त्याला कणकवली पोलिस स्टेशनवर आणण्यात आले. रेड्याची चारा-पाण्याची व निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी त्याला कणकवली पोलिसांकडून सिंधुदुर्गातील विविध गोशाळांमध्ये नेण्यात आले. कणकवलीसह कुडाळ तालुक्यातील गोशाळांमध्ये पोलिस त्या रेड्याला घेवून गेले होते. मात्र या रेड्याचा गोशाळेतील इतर गुरांना त्रास होईल म्हणून त्याला प्रवेश देण्यासाठी गोशाळा चालकाने असमर्थतता दर्शवली. त्यामुळे रविवारी दिवसभर विविध गोशाळांमध्ये जावून परत रेड्याला कणकवली पोलिस स्टेशन आवारात ठेवावे लागले.