वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा
सोमवारी सायंकाळी भुईबावडा घाटात झालेल्या ढगफुटीने घाट रस्त्याची दैना उडाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाटातील दरडी हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासून हलकी वाहतूक सुरू करण्यात आली आहे; मात्र मोरीचा पाईप वाहून गेल्यामुळे रस्त्याला भगदाड पडल्यामुळे घाटातून एसटी बससह अवजड वाहतूक २९ सप्टेंबरच्या रात्री १२ पर्यंत पूर्णपणे बंद केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल | पाटील यांनी दिले आहेत.
करूळ घाटही बंद असल्यामुळे या घाटातील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळवण्यात आली आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूचा रस्त्याचा काही पृष्ठभाग त्याखालील मातीच्या भरावासह पूर्णतः वाहून गेला असल्याने रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. मोऱ्यांच्या ठिकाणी असलेल्या दोन रांगांच्या पाईपपैकी एका रांगेचे पाईप काही भागात तुटून वाहून गेले असून हेडवॉल पूर्णपणे पडली आहे. या भागात आजही पाऊस सुरू असून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून जात आहे. मोरीच्या वरील बाजूला मोठ्या प्रमाणात दगड मातीचा ढीग जमा झाला आहे. रस्त्याचा पृष्ठभाग सुमारे २.७० मी. इतक्या रुंदीचा राहिला असल्याने या भागातून मोठी वाहने जाणे अपघाताला कारण ठरु शकण्याची शक्यता असल्याने सद्यस्थितीत या भागातून (घाटरस्त्यामधून) केवळ हलक्या स्वरूपाच्या प्रवासी वाहतूकीला परवानगी देऊन इतर वाहतूक फोंडाघाटमार्गे अथवा अनुस्कुरा घाटमार्गे वळविण्याबाबत विनंती केली आहे.
भुईबावडा घाट रस्त्यावरून होणारी जड अवजड वाहनांची वाहतूक २४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. पासून २९ सप्टेंबर रात्री १२ वा. पर्यंत बंद ठेवून सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहतुकीकरिता बंद करण्याचे आदेश जारी करीत आहे. सदर मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक चालू राहील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.