

बांदा : स्थानिक गुन्हा अन्वेषणची बांदा-ओटवणे मार्गावर कारवाई संशयित दोघे कडगाव (ता. भुदरगड) येथील दोन मोटारसायकलींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाणे हद्दीत धाडसी कारवाई करत 2 लाख 6 हजार रुपयांच्या दारू आणि दोन मोटारसायकलींसह दोघांना अटक केली आहे.
ही कारवाई बुधवार, दि. 16 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास विलवडे - बांदा - ओटवणे मार्गावर करण्यात आली. निवेल बावतीस बारदेसकर (वय 39) व विठ्ठल गोविंद पाटील (35, दोघे रा. कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, सध्या रा. सोहाळे, ता. आजरा) अशी त्यांची नावे आहेत.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि 36 हजार रुपयांची गोवा दारू असा एकूण 2 लाख 6 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. संशयितांनी ही दारू गोव्यातून महाराष्ट्रात तस्करीसाठी आणल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
प्रत्यक्ष कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहा. उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलिस अंमलदार अमर कांडर यांनी सहभाग घेतला. संबंधित दोघांविरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बांदा पोलिसांकडून सुरू आहे.