

सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सावंतवाडी तालुक्यात मोठी कारवाई करत 4 लाख 29 हजारांच्या गोवा दारूसह 12 लाखांची दोन वाहने मिळून 16 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गांधी सप्ताहनिमित्ताने अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून 3 ऑक्टोबर रोजी भरारी पथकाने सापळा रचून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तपासणी केली. या कारवाईत दोन वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 4 लाख 29 हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे एकूण 45 बॉक्स मद्यसाठ्याचा समावेश आहे. यासह, अवैधरित्या दारूची वाहतूक करण्यासाठी वापरलेली हुंडाई सेंट्रो झिंग कार आणि जीप कंपास ही दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत, ज्यांची अंदाजित किंमत 12 लाख रुपये आहे.
याप्रकरणी दत्तात्रय भिमराव बंडगर (50, रा. मिरज, जि. सांगली) आणि गजानन दिनकर पाटील (49, रा. रूईकर कॉलनी, कोल्हापूर) या दोन संशयितांविरोधात दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक एस. ए. जाधव आणि दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील पुढील तपास करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूविक्रीविरोधातील ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.