

दोडामार्ग : मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यभरात संतप्त वातावरण निर्माण झाले असून, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं उपोषण चौथ्या दिवशीही सुरू आहे. शासनाकडून अद्याप ठोस पावलं उचलली जात नसल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे. या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपर्यातून अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून, आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवही ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिली मराठा टीम मंगळवारी संघर्ष स्थळी रवाना होणार असून, या टीमचे नेतृत्व ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी करणार आहेत. बाबुराव धुरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा मागे हटणार नाही. आम्ही शांततेत लढा देत आहोत, पण शासनाने जर वेळकाढूपणा केला तर आंदोलनाचा भडका उडेल. त्यांनी हे देखील सांगितले की, मराठा समाजाची सहनशीलता आता संपत आली असून, जर न्याय मिळाला नाही तर हा लढा अधिक तीव्र व निर्णायक पातळीवर नेला जाईल.
मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून सातत्याने मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे. त्यांच्या उपोषणामुळे राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात हालचाली निर्माण झाल्या आहेत. मात्र, शासनाकडून केवळ आश्वासनांची उधळण होत असल्याचा आरोप समाजबांधव करत आहेत. त्यामुळे या आंदोलनाची दिशा अधिक उग्र व आक्रमक होत चालली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जे कार्यकर्ते रवाना होत आहेत, ते सर्वजण समाजाच्या हक्कांसाठी झटणारे आहेत. स्थानिक पातळीवर विविध गावांत बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, जनजागृतीसाठी मोर्चेही काढले जात आहेत.