पुतळा अनावरण कार्यक्रमात जिल्हा नियोजनाच्या निधीत भ्रष्टाचार : आ. वैभव नाईक

भ्रष्टाचारातील पैसा खासदार राणेंनी निवडणुकीत वापरला
Corruption in district planning funds during Navy Day and statue unveiling program: Vaibhav Naik
पत्रकार परिषदेत बाेलताना आ. वैभव नाईक.File Photo
Published on
Updated on

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारानंतर अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार उघड होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिलेल्या भारतीय नौसेनेच्या नौदल दिन कार्यक्रम व छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून सुमारे साडेपाच कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. नौसेनेचा कार्यक्रम असताना जिल्हा नियोजनमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेल्या या निधीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारातील व अन्य कामांत झालेल्या भ्रष्टाचारातून जमलेला पैसा भाजपचे खा.नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आ. वैभव नाईक यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टर मधील इंधनासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे खर्च करण्याची ही पहिलीच घटना आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज (रविवार) आयोजित पत्रकार परिषदेत आ.वैभव नाईक बोलत होते. यावेळी सहसंपर्क प्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आदी उपस्थित होते.

आ.वैभव नाईक म्हणाले, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होत आहेत. खरंतर शिल्पकार जयदीप आपटे यांना आतापर्यंत 26 लाख रुपयेच पोच झाले आहेत अशी माहिती पोलीसांना दिलेल्या जबाबात उघड झाली आहे. त्यामुळेच या पुतळा कामात भ्रष्टाचार झालेला आहेच. या शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिलेल्या नौसेनेचा नौदल दिन व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातील दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले आहेत. आमच्या माहितीप्रमाणे या कार्यक्रमासाठी नौसेना आणि जिल्हा नियोजन असे डबल पैसे खर्ची घालण्यात आले असल्याचा आरोप आ.नाईक यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शिल्पकार आपटेला 26 लाख रूपयेच देण्यात आले, तर मग याबाबत नौसेना गप्प का?, याबाबत नौसेनेने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. नौसेनेने या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून साडेपाच कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. खरतर नौसेना आपल्या कार्यक्रमासाठी आपण खर्च करते. परंतू जिल्हा नियोजन मधून साडेपाच कोटी रूपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी खर्च करण्यात आले आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बांधकाम, सुशोभीकरण, नौसेना कार्यक्रम, तसेच रेल्वेस्टेशन सुशोभीकरण यात झालेल्या भ्रष्टाचाराचातील पैसा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप आ. वैभव नाईक यांनी केला.

भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्या हाती

आम्ही केवळ विरोधक म्हणून आरोप करीत नाहीत, तर ज्या ज्या कामात भ्रष्टाचार झाला त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. जिल्हा नियोजन मधून खर्ची घालण्यात आलेल्या पैशाचे लेखी पुरावे आमच्याकडे आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पालकमंत्री किवा सत्ताधारी याबाबत गप्प आहेत. उलट आम्ही आरोप करतो म्हणून शिवरायांच्या पुतळा पाडण्यात आमचा हात आहे, असा आरोप काहींनी केला. पाच सहा दिवसांत पुरावे देतो म्हणून सांगणारे कुठे गेले? की लोकांचे लक्ष भ्रष्टाचारापासून दुसरीकडे वळविण्यासाठी आमच्यावर हे आरोप केले होते का? असा सवाल आ.नाईक यांनी करत निलेश राणेंचे नाव घेणे टाळले.

याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करणार

जिल्हा नियोजन मधून कशाप्रकारे पैसे खर्च करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील अधिका-यांनी यावर कशाप्रकारे पैसे खर्च केले आहेत. यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करणार असून यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत. त्यामुळे आता अधिकारी व सत्ताधारी यांनी पालकमंत्र्यांच्या संगनमताने अंदाधुंद कारभार केला आहे, याचा पर्दाफाश होणार आहे.

जिल्हा नियोजनच्या पैशाची चौकशी करा

पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी जिल्हा नियोजनचे पैसे?, त्यांच्याकडे पैसेच नाहीत का? असा सवाल आ. नाईक यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा नियोजन मधून खर्च झालेल्या साडेपाच कोटी रूपयांची चौकशी करा अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी केली आहे. नौदल दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधान, मंत्री, अतिमहनीय व्यक्ती, नौदल अधिकारी व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमासाठी डिव्ही कार व इतर शासकीय वाहने व हेलिकॉप्टरसाठी इंधन व्यवस्था 37 लाख 90 हजार रूपये, मान्यवरांसाठी व एसपीजी टीमसाठी निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था 25 लाख 50 हजार रूपये, मंडप व्यवस्था व अनुषंगिक बाबींसाठी 2 कोटी रूपये, बॅरिकेटींगसाठी 1 कोटी 50 लाख रूपये, इंटरनेट /वायरलेस /टेलिफोन, पाणी पुरवठा, ओळखपत्र छपाई व इतर किरकोळ खर्च 18 लाख 50 हजार रूपये, जिल्ह्यातील व बाहेरच्या जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांच्याकरीता भोजन व्यवस्था, वाहन व्यवस्था, निवास व्यवस्था, व इतर आवश्यक साहित्य करीता 1 कोटी 22 लाख 45 हजार रूपये असा एकूण 5 कोटी 54 लाख 35 हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आ. वैभव नाईक यांनी करून चौकशीची मागणी केली आहे.

आपटे घरातच कसा सापडला ?

आ.नाईक म्हणाले, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौसेनेने याबाबतची तक्रार देणे आवश्यक होते. मात्र पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार द्यायला लावली. या घटनेची देशपातळीवर दखल घेण्यात आली. मग काही दिवसांनी शिल्पकार आपटे घरातच कसा काय सापडतो?, याचा अर्थ त्याला कोणीतरी लपवून ठेवले होते असाच होतो, असे आ.नाईक म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news