वारा नाही आला... झाड नाही पडलं... अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा नडला!

शोध यंत्रणा घेत असतानाच काही माहिती समोर
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse issue
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोटवरील मूळ पुतळा.Pudhari File Photo
Published on
Updated on
गणेश जेठे

राजकोट (मालवण) : वारा तर आलाच नाही... त्यामुळे झाडही पडलं नाही... ते कशाला, साधं पानही पडलं नाही, असं म्हणतात. तरीही 2 कोटी 48 लाख रुपये खर्च करून नौदलाने उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा भर दुपारी पडतो कसा, याचा शोध युद्धपातळीवर विविध यंत्रणा घेत असतानाच काही माहिती समोर येत आहे. त्यादिवशी जास्त वारा नव्हताच. त्यामुळे आजूबाजूला कुठेही एखादे झाड पडल्याची घटना नाही. आता यामागे प्रशासन आणि त्यामधील अधिकारी यांचा हलगर्जीपणा पुढे येतो आहे. अर्थात या घटनेला जबाबदार अधिकारी मात्र माफीचा एकही शब्द व्यक्त करायला तयार नाहीत. एवढेच नव्हे तर सर्वच अधिकारी बचावाच्या पवित्र्यात आहेत. येणार्‍या काही दिवसांत अधिकार्‍यांविरुद्धही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. नौदलाने प्राथमिक पाहणीनंतर पुढील कारवाईस सुरुवात केली आहे.

गेल्या सोमवारी मालवणमधील राजकोटवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर संताप, मग आंदोलने, मग मालवणमधील महाविकास आघाडीचा मोर्चा आणि त्यानंतर झालेला राडा या गदारोळात चार दिवस संपल्यानंतर आता चौकशीचा आणि तपासाचा ससेमिरा अनेकांच्या मागे सुरू झाला आहे. या घटनेमध्ये जबाबदार असलेले अधिकारी तरी कसे सुटणार, याची पुरेपूर कल्पना अधिकार्‍यांना आली असल्यामुळे जो तो अधिकारी बचावाच्या पवित्र्यात आहे. लोकांचा संताप कमी व्हावा यासाठी अगदी पहिल्या फटक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर डॉ. चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. परंतु हे झाले ठेकेदार. प्रत्यक्षात दुर्घटनेमागे अधिकारीही जबाबदार आहेत आणि ते कोण आहेत याचा शोध तातडीने सरकारने घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता मालवणवासीय करत आहेत.

वारा होता 45 किलोमीटर वेगाचा

समुद्र किनारपट्टीवर साधारणतः 45 किलोमीटर वेगाचा वारा वाहतच असतो. मच्छीमारांचे म्हणणे तेच आहे. ज्यादिवशी सोमवारी दुपारी 12.30 वाजता पुतळा कोसळला तेव्हा वार्‍याचा वेग सामान्य होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा पुतळा कोसळला तेव्हा जोराचा आवाज झाला. विशेष म्हणजे त्या वेळेमध्ये किंवा त्यादिवशी राजकोट परिसरात एकही झाड किंवा झाडाची फांदी खाली पडली नाही. असे असताना सहा टन किलो वजनाचा हा पुतळा वार्‍याने कसा पडेल? शक्यच नाही, इथपर्यंत तपासी अधिकार्‍यांचा निष्कर्ष आला आहे. त्यामुळे हा पुतळा माणसांच्या म्हणजेच अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे पडला आहे हे स्पष्ट होत आहे.

तीन वर्षे लागणारा पुतळा तीन महिन्यांत बनवला

मालवणच्या तारकर्ली समुद्र किनार्‍यावर नौसेना दिन साजरा होणार हे साधारणतः जुलै 2023 मध्ये बाहेर पडले होते. सुरुवातीला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकारी द्यायला तयार नव्हते. तोवर हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता आणि पुतळा उभारण्याचा निर्णयही झाला होता हे आता उघड झाले आहे. कारण जून 2023 मध्ये शिल्पकार जयदीप आपटे याला सरकारच्या काही प्रतिनिधींनी विचारणा केली, असे जयदीप आपटे यानेच म्हटले आहे. त्यानंतर 8 सप्टेंबर 2023 रोजी प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना देण्यात आला. नौदलाच्या मुंबईतील नवल डॉकयार्ड कार्यालयाने ही वर्कऑर्डर मेसर्स आर्टिस्ट्री या कंपनीला दिली. कंपनीचे मालक अर्थातच जयदीप आपटे आहेत. इतका मोठा पुतळा उभारण्यासाठी किमान तीन वर्षे लागतात, असे अनुभवी शिल्पकारांचे म्हणणे आहे. परंतु प्रत्यक्षात केवळ तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. या वर्कऑर्डरवर नवल डॉकयार्डचे कॅप्टन प्रणिथकुमार यांची सही आहे.

सुपरव्हिजनची जबाबदारी नौदलाची

हा पुतळा उभारण्यासाठी 2 कोटी 48 लाखांचा निधी हा कुठून उभारावा, असा एक प्रश्न निर्माण झाला. नौदलाला त्यावेळी हा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला. सार्वजनिक बांधकाम खात्याने जेव्हा निधी दिला ती आपली जबाबदारी संपली असा दावा आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करत आहेत. कारण ज्यांनी वर्कऑर्डर दिली त्यांनीच कामाचे सुपरव्हिजन करणे आवश्यक आहे. त्या कामाला नौदलाच्या अधिकार्‍यांनीच सुपरव्हिजन केले, त्याचे एमबी रेकॉर्ड, व्हॅल्युएशन आणि बिल अदा करणे ही जबाबदारी नौदलाच्या अधिकार्‍यांची आहे, असे बांधकाम विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

वार्‍याच्या वेगाचा प्रश्न नाही : कामच निकृष्ट

या पुतळ्याचे कामच निकृष्ट झाले हे स्पष्ट झाले आहे. चौथरा टिकून राहिला. मात्र चौथर्‍याच्या वरील 28 फूट उंचीचा पुतळा पायातून तुटून खाली पडला. त्यासाठी वापरलेले जे लोखंड होते ते गंजलेले होते. त्याशिवाय ते कमी जाडीचे होते. पाया आणि पुतळा यांना जोडणारे जे लोखंड होते ते खूपच कमी आणि कमकुवत वापरले होते. त्याशिवाय जे नट बोल्ट लावण्यात आले होते ते गंजले होते. हे खरे आहे की, खार्‍या वार्‍याच्या बाजूला असलेले लोखंड लवकर गंजते. परंतु मच्छीमार बांधव व इतर हॉटेल व्यावसायिक लोखंडाचा वापर किनार्‍यावर करतच नाही असे नाही. त्यासाठी योग्य ती प्रक्रिया करून काळजी घेतात. इथे ती काळजी घेतली गेली नसल्याचे दिसते आहे.

हलगर्जीपणाच नडला

असे सांगितले जाते की, पुतळ्याच्या कामासाठी एकूण 6 हजार किलो मटेरियल वापरण्यात आले. त्यामध्ये लोखंड आणि ब्राँझ धातूचा समावेश होता, परंतु प्रत्यक्षात 6 टन मटेरियल वापरले का? ते दर्जेदार होते का? आणि नेमक्या ब्राँझ धातूचाच वापर केला का? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. कारण जेव्हा पुतळा उभा होता तेव्हा त्याचा रंग तांबूस होता. मात्र गेल्या पावसाळ्यातील गेल्या दोन महिन्यात त्याच्या रंगामध्ये काही बदल होऊन तो चंदेरी बनत चालला होता. कारण पुतळा जेव्हा कोसळला तेव्हा त्याच्या भागांचा चंदेरी रंगच दिसत होता. त्याशिवाय स्थानिक लोकांना वाटत होते की हा पुतळा हलतो आहे आणि त्याचे नट बोल्ट सैल झाले असावेत म्हणून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिलीही होती. परंतु वेळेत खबरदारी घेतली गेली नाही आणि पुतळा कोसळला.

20 तारखेला पत्र, पोहोचले 23 ला आणि पुतळा कोसळला 26 ला

जेव्हा स्थानिक लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिली तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाल केली नाही. पुतळा उभारण्याची जबाबदारी असलेल्या नौदलाला 20 ऑगस्ट रोजी पत्र पाठविले. नौदलाला पत्र मिळाले 23 ऑगस्टला, परंतु आपल्याकडून हलगर्जीपणा झाला आहे याचे भान ना नौदल अधिकार्‍यांना राहिले की ना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सतर्कपणा दाखवला आणि सोमवारी 26 ऑगस्ट रोजी म्हणजे तीन दिवसांनी पुतळा कोसळला. जेव्हा स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिली तेव्हा केवळ कागदी घोडे नाचवण्यावर अवलंबून न राहता जर तातडीने अ‍ॅक्शन घेतली असती तर ही दुर्घटना घडली नसती.

जबाबदारी केव्हा निश्चित होणार?

आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे. ही समिती नेमल्यानंतर नौदलाचे गोवास्थित अधिकारी थेट राजकोटला भेट देऊन गेले. नंतर फॉरेन्सिक विभागाच्या पोलिस अधिकार्‍यांनी काही नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी नेले. मात्र नौदलाचे अधिकारी असो किंवा फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी असो, प्रसारमाध्यमांपासून सतत दूर राहत असून कोणतीही माहिती देण्यास नकार देत आहेत. यातून ठेकेदारांवर सर्व जबाबदारी झटकून आपण सेफ झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news